सायबर चोरट्यांचा लुटीचा ‘ॲप पॅटर्न’; लिंकवर क्लिक करून होतेय लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:38 PM2023-01-28T13:38:12+5:302023-01-28T13:38:57+5:30

गेल्या १५ दिवसांत सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या अशा घटना रावेत, हिंजवडी, भोसरी, रावेत, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या...

Cyber Thieves' 'App Pattern' of Looting; Millions of people are being cheated by clicking on the link | सायबर चोरट्यांचा लुटीचा ‘ॲप पॅटर्न’; लिंकवर क्लिक करून होतेय लाखोंची फसवणूक

सायबर चोरट्यांचा लुटीचा ‘ॲप पॅटर्न’; लिंकवर क्लिक करून होतेय लाखोंची फसवणूक

Next

पिंपरी : नमस्कार मी, एमएसईबीच्या ऑफिसमधून बोलतो आहे. आपले वीज बिल अपडेट नसल्याने आजच वीज कनेक्शन कट करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या फोनवर पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा आणि माहिती भरा. या फोननंतर नानासाहेब निवृत्ती जगताप (५६, रा. हिंगणे, पुणे) यांनी ॲप डाऊनलोड करून माहिती भरली. मात्र, त्या ॲपच्या माध्यमातून जगताप यांच्या बँक खात्यातून तब्बल सायबर चोरट्यांनी तब्बल साडेनऊ लाख रुपये काढून घेतले, तर व्हॉटसॲपवर आलेल्या माहितीच्या आधारे ॲप डाऊनलोड करून त्या माध्यमातून ट्रेडिंग करण्याच्या बँका खात्यातील १२ लाख रुपये चोरट्यांनी काढून घेतले. सायबर चोरट्यांच्या या ‘ॲप पॅटर्न’मुळे अनेकांची बँक खाती रिकामी होत आहेत. गेल्या १५ दिवसांत सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या अशा घटना रावेत, हिंजवडी, भोसरी, रावेत, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

सायबर फिशिंगचे बळी

मच्छिमार हा मासा पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतो आणि गळात मासा अडकतो, तसेच सायबर चोरटे सावजाला फसवण्यासाठी त्याच्या मोबाईलवर एखादा एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज, इ-मेल पाठवतात. ज्यामध्ये तुमचे खाते लवकरच बंद होणार आहे, केवायसी, वीज बिल अपडेट करा किंवा ठरावीक ॲपच्या माध्यमातून ट्रेडिंग करा, असा दावा केला जातो. तसेच पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. एकदा का तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले की तुमचे बँक अकाऊंट रिकामे झालेच म्हणून समजा.

एक लाईकची किंमत १२ लाख २३ हजारांना

व्हिडीओला लाईक केले म्हणून रिफंडापोटी ५० रुपये मिळाले. तब्बल १६ वेळा असे रिफंड म्हणून नऊ हजार रुपये मिळाले. त्यामुळे या टास्कमध्ये पैसे गुंतवले तर रकमेचा चांगला रिफंड आणि बोनसदेखील मिळेल, असे आश्वासन मिळाल्याने एकाने अवघ्या एका दिवसात तब्बल १२ लाख २३ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, या गुंतवणुकीनंतर संबंधिताने टेलिग्राम ग्रुपच डिलिट करून गुंतवणूक केलेल्या पैशाचा परतावा न देता फसवणूक केली. हिंजवडी येथे ही घटना नुकतीच घडली.

काय काळजी घ्यावी

- अनोळखी फोन नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.

- एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन किंवा एसएमएस करणाऱ्याला बँक डिटेल्स देऊ नका.

- नियमितपणे तुमचे बँक खाते तसेच खात्यावरील रक्कम तपासा. संशयास्पद व्यवहाराबाबत लगेच बँकेला कळवा.

- कुठलेही अनोळखी ॲप डाऊनलोड करून पैशांचे व्यवहार करू नका.

- अधिकृत संकेतस्थळावरून माहिती भरा.

वैयक्तिक क्रमांकावरून रक्कम भरण्यासाठी पाठविण्यात आलेली कोणतीही ऑनलाइन लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. वीज बिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे.

- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नये. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतीही ॲप, लिंक ओपन करू नये. नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत असेल तर ते cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार करू शकतात.

- संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

Web Title: Cyber Thieves' 'App Pattern' of Looting; Millions of people are being cheated by clicking on the link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.