पिंपरी : महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा, असा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे शहराची पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या विषयी सत्ताधारी आणि विरोधकांनीही स्थायी समितीत नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘शहर वेगाने वाढत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाकड परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. त्यासाठी अधिकचे ५०एमएलडी
पाणी उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरासाठी ४७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. काही दिवसांपासून रोज ५०० एमएलडी पाणी उचलले जात होते. परंतु, राज्य सरकारने जेवढे पाणी निश्चित केले आहे. तेवढेच उचला, असे आदेश दिले आहेत.
पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी झाली आहे. नळजोड नादुरुस्त झाले आहेत. अनधिकृत नळजोडणी अधिक आहे. ते तोडण्यात येणार आहेत. पाइपलाइन दुरुस्त झाल्यास गळीत थांबून शहराची तहान भागू शकते.
अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पॉलिसी आणण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतर्फे वाघोलीतील पाणी योजनेचा
नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात वाघोलीतून दिघी, मोशी, चिखली परिसरासाठी पाणी आणण्याचे नियोजन आहे. शहराच्या काही भागात पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले, की पाण्याची समस्या उद्भवते. पाणी उपलब्धता वाढविणे मोठे आव्हान आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.