PHOTOS : आईच्या निधनानंतर २० दिवसाच्या बिबट्याला गायीने पाजलं होतं दूध, रोज रात्री येतो तिला भेटायला

By अमित इंगोले | Published: November 6, 2020 03:18 PM2020-11-06T15:18:03+5:302020-11-06T15:24:08+5:30

सोशल मीडियावर गाय आणि बिबट्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. लोक यासाठी हैराण आहेत की, हा बिबट्या साखळीने बांधलेल्या गायीला सहज मार खाऊ शकतो.

आईचं प्रेम असं असतं जे केवळ मनुष्य प्राण्यालाच जाणवतं असं नाही तर प्रत्येक प्राण्याला जाणवतं. जनावरांमध्येही आपल्या पिल्लांबाबत असंच प्रेम असतं. जनावरांमध्ये तर स्वत:च्याच नाही तर इतर प्राण्याच्या पिल्लांसाठी प्रेम बघितलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले बिबट्या आणि गायीचे फोटो याचच उदाहरण आहे. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटू शकतं. कुणालाही प्रश्न पडू शकतो की, गाय आणि बिबट्याचं इतकं प्रेमळ नातं कसं? तर यामागे एक कहाणी आहे.

सोशल मीडियावर गाय आणि बिबट्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. लोक यासाठी हैराण आहेत की, हा बिबट्या साखळीने बांधलेल्या गायीला सहज मार खाऊ शकतो. मग तो गायीच्या कुशीत जाऊन का बसला? यामागची कहाणी वाचल्यावर या फोटोंचं महत्व अधिक वाढतं. हे फोटो गुजरातमधील आहेत. ही घटना २००३ मध्ये समोर आली होती. त्यानंतर वेळोवेळी हे फोटो व्हायरल होत होते.

वडोदरातील लोक तेव्हा हैराण झाले जेव्हा एक बिबट्या गायीच्या जवळ जाऊन बसला होता. त्यांनी वाइल्डलाईन डिपार्टमेंटला याची लगेच माहिती दिली. ज्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली होती.

तेव्हा समजलं की, हा बिबट्या रोज रात्री ९ ते १० च्या दरम्यान गायीला भेटायला येतो. यादरम्यान गल्लीतील कुत्रीही खूप भूंकतात. पण बिबट्या न चुकता दररोज गायीला भेटायला येतो. याचं कारणही समोर आलं.

यामागचं कारण म्हणजे जेव्हा बिबट्या २० दिवसांचा होता तेव्हा त्याच्या आईचं निधन झालं होतं. असे सांगतात की, त्यानंतर याच गायीने बिबट्याला स्वत:च दूध पाजलं होतं. तेव्हापासून हा बिबट्या या गायीला आपली आई समजतो. त्यामुळेच तो तिला भेटायला रोज रात्री येतो.

गावातील लोकांना यामुळे एक फायदाही झाला. बिबट्या कुणालाही नुकसान पोहोचवत नाही. बिबट्यामुळे इथे इतर जनावरांचे हल्ले कमी झाले. ज्यामुळे गावातील शेतकऱ्यांना पिकही चांगलं होत आहे.