भाजपच्या संसदीय मंडळात सुषमा स्वराज यांची जागा घेणाऱ्या सुधा यादव कोण आहेत...?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:28 PM2022-08-17T19:28:48+5:302022-08-17T19:32:20+5:30

सुधा यादव कारगिल युद्धात शहीद झालेल्या डेप्युटी कमांडंट सुखबीरसिंह यादव यांच्या पत्नी असून, त्यांच्या राजकारणाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाली आहे.

नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी आता भाजपने एक मोठा निर्णय घेतला असून, पक्षाने संघटनेत मोठे बदल केले आहेत. आज(बुधवारी) भाजपने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली. पक्षाने दिग्गज नेते नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना संसदीय मंडळातून वगळले आहे तर बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, देवेंद्र फडणवीस आणि सत्यनारायण जाटिया या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

कोण आहेत सुधा यादव- या संसदीय मंडळात डॉ.सुधा यादव या एकमेव महिला असून, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. चर्चा अशी आहे की, सुधा यादव यांच्या आधी, संसदीय मंडळात महिला सदस्य म्हणून दिवंगत सुषमा स्वराज होत्या. 2014 पूर्वी त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या आणि मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्या देशातील पहिल्या महिला परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या. आता त्यांची जागा सुधा यादव यांनी घेतली आहे. पण सुधा यादव नेमक्या कोण आहेत? त्या कुठून आल्या? त्यांची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

पती कारगिल युद्धात शहीद-1999 मध्ये सुधा यांच्या खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. कारगिल युद्धानंतर 1999च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान होते राव इंद्रजित सिंग यांचे. काँग्रेसच्या इंद्रजीत यांच्यासमोर दिग्गज नेत्याला उभे केले पाहिजे, असे भाजपच्या बड्या नेत्यांचे मत होते. यावेळी नरेंद्र मोदी हरियाणाचे पक्ष प्रभारी होते. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना महेंद्रगढच्या लोकसभा उमेदवाराबद्दल विचारले असता त्यांनी डॉ. सुधा यादव यांचे नाव पुढे केले.

नरेंद्र मोदींमुळे राजकारणात एंट्री-सुधा यादव यांचे पती बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट होते आणि कारगिल युद्धातच ते शहीद झाले होते. यामुळे सुधा यांनी राजकारणात येण्याचा कुठलाही विचार केला नव्हता. पण, नरेंद्र मोदींनी नाव सुचवल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुधा यांच्याशी चर्चा केली. पण, सुधा यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर पक्षाने सुधा यांचे मन वळवण्याची जबाबदारी प्रदेश प्रभारी नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली. अखेर मोदींच्या शब्दांनी सुधा यांना ऊर्जा दिली आणि त्या राजकारणात उतरल्या.

काँग्रेसच्या दिग्गजाचा पराभव-ही निवडणूक भाजपसाठीही खास होती. सुधा यांनी बीएसएफचे डेप्युटी कमांडंट शहीद सुखबीर सिंग यादव यांच्या पत्नी म्हणून महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी पक्षाची इच्छा होती. भाजपची ही बाजी 'मास्टरस्ट्रोक' ठरली आणि सुधा यादव यांनी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राव इंद्रजित सिंग यांचा एक लाख 39 हजार मतांनी पराभव केला आणि 1999 ते 2004 या काळात त्या खासदार राहिल्या. मात्र त्यानंतर 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही. दोन्ही वेळा त्यांना निवडणुकीच्या मैदानातून रिकाम्या हाताने परतावे लागले. 2015 मध्ये सुधा यादव यांना भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रभारी म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.

मोठा संदेश देण्याचा प्रयत्न-अशा स्थितीत आता भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीमध्ये सुधा यादव यांचा समावेश करण्याबाबत मोठी अटकळ बांधली जात आहे. 'यादव फॅक्टर'मुळे बिहारमधून नुकताच झटका बसलेल्या भाजपला सुधा यादव मोठा फायदा देऊ शकतात, असे मानले जात आहे. दुसरीकडे, हरियाणात पुन्हा एकदा भाजपचे मैदान मजबूत करण्यात सुधा यादव यांचाही मोठा वाटा असेल. पक्षाचा हा डाव कितपत यशस्वी ठरतो, हे येणारे दिवसच सांगतील. पण सुषमा स्वराज यांच्या रिकाम्या जागी सुधा यादव यांना बसवून भाजपने पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर मोठा संदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे.