दिल्लीत माझं स्वत:चं घर नाही...जेव्हा हसत हसत नितीन गडकरींनी सांगितला एका बिल्डरचा किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:29 PM2023-03-29T15:29:50+5:302023-03-29T15:37:40+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एखाद्या व्यासपीठावर असले की नक्कीच त्यांच्याकडून काही ना काही लक्षवेधी गोष्ट ऐकायला मिळते. असोचेमच्या कार्यक्रमाला गडकरी पोहोचले तेव्हा त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात उभारले जाणारे पूल, रस्ते, महामार्ग यांची माहिती दिली.

दिल्लीत आम्ही ६० हजार कोटींचे रस्ते बनवत आहोत, असे ते म्हणाले. १४,००० कोटींचा ईस्टर्न पेरिफेरल हायवे पूर्ण झाल्याची माहिती देत दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येपासून पुढे जाण्यासाठी त्यांनी आपली योजनाही शेअर केली. यादरम्यान त्यांनी त्यांच्या एका हवाई प्रवासाचा किस्सा सांगितला.

गडकरी म्हणाले की, आम्ही दिल्लीत नवीन महामार्ग बनवत आहोत. मी तिथे पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप आनंद झाला. हा DDA रस्ता होता. प्रवेश वर्मा (भाजप लोकसभा खासदार) माझ्याकडे यासाठी अनेक वेळा आले आणि सहाव्या वेळी मी त्यांना हो म्हटलं. त्याची किंमत ८,००० कोटी रुपये इतकी आहे.

पेरिफेरल रोडनंतर हा रस्ता सुरू होतो. एकूण ३६ किमी. येथून तुम्ही थेट द्वारकेला पोहोचू शकता. सध्या पंजाब-हरियाणाहून येणाऱ्या लोकांना विमानतळावर पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. आता तिथून वळल्यावर २० मिनिटात तुम्ही थेट द्वारकेला पोहोचाल. संपूर्ण दिल्ली शहरातील निम्मी वाहतूक तिकडे वळवली तर प्रदूषण कमी होईल.

गडकरी पुढे म्हणाले की, आम्ही ३० किमीचा द्वारका एक्सप्रेस हायवे १०,००० कोटी खर्चून बनवत आहोत. तेथून दिल्ली-मुंबईला जाणार असून शिवमूर्तीजवळ दोन बोगदे बांधले जात आहेत. एक T3 ला जाईल आणि एक वसंत विहारला जाईल, मग धौलकुआंपासून गुडगावपर्यंतची वाहतूक कोंडी निम्मी होईल आणि दिल्लीचे प्रदूषण कमी होईल. द्वारका एक्स्प्रेस वेची चर्चा सुरू असताना गडकरींना एक किस्सा आठवला.

गडकरी म्हणाले की, एकदा मी विमानातून जात होतो. एक मुलगा माझ्याकडे आला. मी विस्ताराच्या फ्लाइटमध्ये होतो. तो मागे होता आणि अचानक येऊन पायाला स्पर्श केला. मला ते आवडले नाही. मी म्हणालो, पाया का पडतोय? तो म्हणाला साहेब माझे आयुष्य बदललं आहे. मी बरीच मालमत्ता खरेदी केली आहे. पण माझ्या जागेत कुणी फ्लॅट खरेदी करत नव्हतं.

द्वारका द्रुतगती महामार्गाचे काम सुरू करताच एकाच प्रोजेक्टमधून मी २ हजार कोटी कमावले, असं त्या व्यक्तीनं सांगितल्याचं गडकरी म्हणाले. हे ऐकून कार्यक्रमात उपस्थित लोक हसू लागले आणि टाळ्या वाजवल्या.

गडकरी पुढे म्हणाले की, मी त्याला गमतीनं म्हटलं की मी अजून दिल्लीत स्वतःचं घर बांधलेलं नाही. तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मीही तुमच्याकडे येऊन सवलतीच्या दरात घर घेतलं असतं. गडकरी पुढे हसत म्हणाले की, संपूर्ण द्वारका द्रुतगती मार्गावरील बांधकाम व्यावसायिकांची गरिबी दूर झाली आहे. ते आज कोट्यधीश झाले आहेत.