मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:26 PM2024-05-01T18:26:36+5:302024-05-01T18:27:29+5:30

Mumbai News : मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गेल्या सात दिवसातील ही तिसरी घटना आहे.

Mumabi News Youth dies in local train between Dombivli Mumbra station | मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

Mumbai Local News : रोज लाखो प्रवाशांना घेऊन धावणारी मुंबईकरांची लाईफलाइन मुंबई लोकल सध्या जीवघेणी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. बुधवारी पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधून आणखी एका तरुणाचा बळी गेला. मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांत तीन तरुणांनी रेल्वेतून पडून जीव गमावल्याने लोकल प्रवास आता चिंतेचा विषय बनला आहे.

याआधी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या दाराजवळ उभे राहिलेल्या अवधेश दुबे, रिया राजगोर यांचा  लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान या दुर्दैवी घटना घडल्या. लोकल गाड्यांची संख्या वाढूनही लोकल अपघातांची संख्या कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ८०० हून अधिक लोकल प्रवासी जखमी झाले होते.

अशातच बुधवारी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीमुळे लोकल मधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल अष्टेकर असे मृत प्रवाशाचे नाव आहे. दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तर तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसात लोकल प्रवासात तिसरा बळी गेला आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरुणीचा मृत्यू झाला होता. डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली होती. गर्दीमुळे तिला डब्ब्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे रिया लोकलच्या दारात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतला असता कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि रुळावर डोक्यावर पडली. जबर मार बसल्याने रियाचा जागीच मृत्यू झाला.

याआधी २३ एप्रिल रोजी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमधून पडून २५ वर्षीय आयटी व्यावसायिक, अवधेश राजेश दुबे यांचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीच्या ठाकूरवाडी परिसरात अवधेश राहत होता. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधेश डोंबिवलीहून सकाळी ८.४५ च्या सुमारास गर्दीच्या वेळी जलद लोकलमध्ये चढला. दिवा ते मुंब्रा दरम्यान तो खाली पडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवधेशकडे धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच अवधेशचा मृत्यू झाला होता.
 

Web Title: Mumabi News Youth dies in local train between Dombivli Mumbra station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.