कौतुकास्पद! जम्मू आणि काश्मीरमधील ३ बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 05:35 PM2023-06-16T17:35:11+5:302023-06-16T17:37:46+5:30

श्रीनगरमधील नौशेरा येथे राहणाऱ्या तुबा बशीर, रूतबा बशीर आणि अर्बिश यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे.

'ज्यांच्या पंखात बळ असते, ते आकाशाची उंची गाठू शकतात' या ओळी जम्मू आणि काश्मीरमधील तीन बहिणींना बरोबर लागू पडतात. या तीन बहिणींनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परीक्षेत (NEET) भरघोस यश मिळवले. श्रीनगरमधील नौशेरा येथे राहणाऱ्या तुबा बशीर, रूतबा बशीर आणि अर्बिश यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे.

या तीन बहिणींनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 'नीट'चा गड सर केला. या चुलत बहिणी सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण इस्लामिया उच्च माध्यमिक विद्यालय श्रीनगरमधून पूर्ण केले.

आजूबाजूच्या भागात अनेक दशके भीतीचे वातावरण असताना देखील या बहिणींनी आपला अभ्यास कधीच थांबवला नाही. कोचिंग, मेहनत आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याने NEET परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना या तिन्ही बहिणींनी आपल्या यशाचे रहस्य सांगितले. "माझ्या कुटुंबात कोणीच डॉक्टर नव्हते, पण मी स्वत:च ठरवले आहे की डॉक्टर बनायचे. यासाठी मी खूप मेहनत घेतली", असे अर्बिशने सांगितले.

तर उर्बिशने म्हटले, "मी आज खूप खुश आहे, माझ्या आई-वडिलांनी सुरूवातीपासूनच खूप साथ दिली. परिक्षेची तयारी करतानाच आम्ही ठरवले होते की, हा आमचा पहिला आणि शेवटचा प्रयत्न आहे आणि याच हिशोबाने अभ्यास केला."

तसेच आम्ही सोबत शाळेत गेलो आणि आता एकत्र नीट क्लिअर केली याचा आनंद आहे. आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले याचा खूप आनंद असल्याचे तुबा बशीरने सांगितले.

रूतबा बशीरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ११वीत असतानाच नीट परिक्षेची तयारी सुरू केली होती. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले.

"आम्ही मन लावून अभ्यास केला आणि आज हे यश सगळेजण पाहत आहेत. पण यामागे आमच्या आई-वडिलांचा मोठा हात असून त्यांच्यामुळेच सर्वकाही शक्य झाले", असे रूतबाने अधिक सांगितले.