४०० जागांचे लक्ष्य, नरेंद्र मोदींचा कानमंत्र; विरोधकांसाठी भाजपाचा 'असा' आहे Counter Plan

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:40 PM2023-06-21T19:40:03+5:302023-06-21T19:52:52+5:30

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नव्या राजकीय समीकरणासह निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. भाजपा पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हा नारा केवळ घोषणेपर्यंतच नाही तर ग्राऊंडवर अमलात आणण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. याचाच भाग म्हणून भाजपा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डझनहून अधिक अल्पसंख्याक उमेदवारांना तिकीट देण्याची तयारी करत आहे जेणेकरून मुस्लिम बहुसंख्य जागांवर कमळ विजयी होईल.

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपा मिशन-२०२४ मध्ये पूर्ण जोमाने उतरला आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील अल्पसंख्याकबहुल ६६ जागा जिंकल्या तरच पक्षाचे हे लक्ष्य साध्य होऊ शकते.

अशा स्थितीत ६६ अल्पसंख्याकबहुल जागांपैकी एक तृतीयांश जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपाने तयारी सुरू केली आहे. या यादीत केरळच्या वायनाडचाही समावेश आहे, जिथून काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले आहेत.

भाजपच्या रणनीतीकारांचा असा विश्वास आहे की, पक्षाला लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असतील तर देशातील ६६ अल्पसंख्याक बहुल जागांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. या अशा जागा आहेत जिथे मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार ३० टक्क्यांहून अधिक आहेत. पक्षाने देशातील १५ राज्यांमध्ये ६६ अल्पसंख्याक बहुल जागा निवडल्या आहेत आणि त्यानुसार तयारी सुरू आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला यापैकी अनेक अल्पसंख्याक-बहुल जागा जिंकता आल्या, परंतु त्यांच्यावरील विजयाचे अंतर फारच कमी होते. अशा स्थितीत भाजपाला आपल्या ताब्यात असलेल्या जागांवर तसेच अन्य जागांवर विजयाचा झेंडा फडकवायचा आहे त्यामुळे हायकमांडने भाजपाच्या मुस्लिम नेत्यांना या सर्व जागांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

भाजपचे लक्ष असलेल्या ६६ अल्पसंख्याक-बहुल जागांपैकी १३ मुस्लिमबहुल जागा यूपीमध्ये आहेत, तर बिहारमध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत. यूपीमध्ये सहारनपूर, कैराना, रामपूर, बरेली, नगीना, मुरादाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर, बिजनौर, संभल, अमरोहा, बहराइच, श्रावस्ती या जागांचा समावेश आहे.

तसेच बिहारमध्ये लोकसभेच्या ४ जागा ज्यावर भाजपचे विशेष लक्ष आहे. या जागा मुस्लिम बहुल बिहारच्या पूर्णिया, कटिहार, किशनगंज आणि अररिया या जागा आहेत. या चार जागा बिहारच्या सीमांचल प्रदेशातील आहेत, जिथे मुस्लिम लोकसंख्या ३० ते ६५ टक्के आहे.

केरळमध्ये अल्पसंख्याकबहुल आठ जागांवर भाजपा विशेष प्रयत्न करत आहे. केरळमध्ये मुस्लिमांसह ख्रिश्चन समाजाची मते मिळविण्याची कसरत भाजपा करत आहे. केरळमधील वायनाड, कासारगोड, कोट्टायम, कोझिकोड, मलप्पुरम, वडकारा, पठानमथिट्टा, इडुक्की या जागांवर भाजप बूथ स्तरावर काम करत आहे. वायनाड हीच जागा आहे जिथून काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले होते, सध्या त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

अल्पसंख्याक बहुल जागांवर विजय मिळवण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील मजबूत चेहरे उभे करण्याच्या रणनीतीवर पक्ष काम करत असल्याचे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यावेळी पक्षाकडे तळागाळातील आणि अल्पसंख्याकांचे भक्कम चेहरे आहेत ज्यांच्यावर पक्ष बाजी मारू शकतो असा विश्वास आहे. यामध्ये, बिहार, यूपी, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अल्पसंख्याक बहुल जागांवर अल्पसंख्याक (मुस्लिम आणि ख्रिश्चन) समुदायातील उमेदवार उभे करण्याची तयारी केली जात आहे जेणेकरून ते विजय नोंदवू शकतील.

अल्पसंख्याकबहुल जागांवर राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीने डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीत दिल्लीत पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्याची योजना आखली आहे. या रॅलीत अल्पसंख्याक समाजातील एक लाखाहून अधिक लोकांची गर्दी जमवण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून राजकीयदृष्ट्या मोठा संदेश दिला जाऊ शकतो. यावेळी, भाजपाने मुस्लिम मते जिंकण्यासाठी विरोधकांच्या रणनीतीसाठी एक काउंटर प्लॅन तयार केला आहे, ज्यामध्ये पीएम मोदी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राने जिंकण्याचा प्रयत्न करतील.