महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:38 PM2021-07-06T19:38:55+5:302021-07-06T19:43:55+5:30

राज्यातील भाजपच्या २ खासदारांचं मंत्रिपद जवळपास नक्की; इतर दोन राज्यमंत्र्यांची धाकधूक वाढली

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोदी सरकार २.० मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात किमान २० नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेला देण्यात आलेलं मंत्रिपद रिक्त झालं. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

नारायण राणेंसोबतच खासदार कपिल पाटील यांच्या नावाचीदेखील मंत्रिपदासाठी चर्चा आहे. नारायण राणे, कपिल पाटील सध्या दिल्लीतच आहेत. त्यामुळे या दोघांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

नारायण राणे मराठा समाजातील महत्त्वाचे नेते आहेत. तर कपिल पाटील ओबीसी समाजातून येतात. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय पेटला असल्यानं या दोन्ही नेत्यांना मंत्रिपद देणं भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं.

नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांचं नावदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. २०१४ मध्ये त्या पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांना मंत्रिपद दिलं गेल्यास भौगोलिक समतोल राखण्यासाठी काही मंत्र्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो.

सध्या महाराष्ट्रातील सहा खासदार मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल यांच्याकडे कॅबिनेट मंत्रालय आहे. त्यांना कायम ठेवण्यात येईल अशी दाट शक्यता आहे. मात्र राज्यातील काही खासदारांची राज्यमंत्रिपदं जाऊ शकतात.

महाराष्ट्रातील तिघांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजप खासदार संजय धोत्रे, रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. यातील धोत्रे आणि दानवे यांचं मंत्रिपद जाऊ शकतं. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

नारायण राणे आणि कपिल पाटील यांना दिल्लीतून बोलावणं आल्यानं त्याचं मंत्रिपद निश्चित समजलं जात आहे. मात्र या दोघांसोबत आणखी एक-दोन जणांना संधी द्यायची असल्यास काही विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्यामुळे आठवले वगळता इतर दोन मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.