माळ्याची मुलगी पंतप्रधान मोदींसोबत करणार योगासने; निवड झाल्यानंतर ११ वर्षीय दीपा म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 10:55 AM2022-06-18T10:55:44+5:302022-06-18T11:00:06+5:30

International Yoga Day 2022 : दीपा गिरी हिची अंडर-14 राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडसाठी निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडची मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत योग करणार आहे. ११ वर्षीय दीपाची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दीपा आपल्या ट्रेनर कांचन रावत यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाली आहे.

नैनिताल येथील महाधिवक्ता कार्यालयात माळी म्हणून काम करणाऱ्या किशन गिरी यांची मुलगी दीपा गिरी हिची अंडर-14 राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडसाठी निवड झाली आहे. योग दिनानिमित्त २१ जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योगाचा कार्यक्रम होणार आहे.

दीपा गिरी (११) तल्लीतालच्या कृष्णपूर भागात राहणारी अटल उत्कृष्ट शासकीय मुलींच्या आंतर महाविद्यालयात सहावीत शिकत आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून योगा करत असल्याचे तिने सांगितले.

भविष्यात दीपाला योग क्षेत्रात करिअर करायचे आहे. दीपाने जीजीआयसी धौलाखेडा हल्दवानी येथे एनसीईआरटीद्वारे आयोजित राज्यस्तरीय योग ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडमध्ये स्थान मिळवले.

राष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीत हे ऑलिम्पियाड होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. जेव्हा मला समजले की पंतप्रधान नरेंद्र मोदीही कार्यक्रमाला पोहोचत आहेत, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी खूप आनंदी आहे, असे दीपाने सांगितले.

दीपाचे वडील माळी आहेत तर आई कमला गिरी गृहिणी आहेत. तर अटल उत्कृष्ट जीजीआयसीच्या प्राचार्या सावित्री दुगतल यांनी सांगितले की, दीपा तिची ट्रेनर कांचन रावत यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाली आहे.

दीपाच्या या यशाबद्दल सावित्री दुगतल, कांचन रावत तसेच तिच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा कंदपाल, मनोज मैठानी आदींनी आनंद व्यक्त केला आहे.