३ सुवर्ण जिंकल्यानंतर ९५ वर्षीय आजीबाईंचं भारतात आगमन; लोकांनी केलं जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:59 PM2023-04-04T13:59:37+5:302023-04-04T14:04:34+5:30

World Masters Athletics Indoor Championship 2023 : वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारतासासाठी ३ सुवर्ण पदक जिंकलेल्या ९५ वर्षीय आजीबाईंचं भारतात आगमन झाले

वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारतासासाठी ३ सुवर्ण पदक जिंकलेल्या ९५ वर्षीय आजीबाईंचं भारतात आगमन झाले आहे. भगवानी देवी यांचे मंगळवारी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पोलंड येथे झालेल्या नवव्या वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या भगवानी देवी यांनी सहभाग नोंदवला होता. ३ सुवर्ण जिंकल्यानंतर ९५ वर्षीय देवी यांनी मायदेशात पुनरागमन केले.

सुवर्ण विजेत्या आजीबाईंची एक झलक पाहण्यासाठी दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी लोकांना एक भावनिक संदेश दिला.

९५ वर्षीय आजीबाईंच्या या सोनेरी यशाचे कौतुक केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील केले. तसेच पदक जिंकण्याचा पूर्ण विश्वास होता असे देवी यांनी यावेळी सांगितले.

देवी यांचे दिल्ली विमानतळावर आगमन होताच लोकांनी त्यांना नोटांचा आणि फुलांचा पुष्पहार घातला. भगवानी देवी डागर यांनी पोलंडमध्ये ३ सुवर्ण जिंकून तिरंग्याची शान वाढवली.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्विट करत भगवानी देवी यांचे अभिनंदन केले. ९५व्या वर्षी ३ सुवर्ण पदक जिंकणे फार निराळी गोष्टी असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.

भगवानी देवी यांनी एक भावनिक संदेश देताना म्हटले, "आपल्या मुलांना शिकवा, धावायला लावा... जेणेकरून ते देशासाठी पदक जिंकतील."

ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये देवी यांनी ६० मीटर धावणे, डिस्कस थ्रो आणि शॉटपुट या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले.

मूळच्या हरयाणा येथील असलेल्या भगवानी देवी यांनी वयाच्या ९५व्या वर्षी पदक जिंकून तरूणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही सीमा नसते याचा प्रत्यय देवी यांनी दाखवून दिला.