नवीन 'वंदे भारत' ट्रेनच्या भाड्याची संपूर्ण लिस्ट आली समोर; 30 सप्टेंबरपासून 'या' मार्गावर धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:01 PM2022-09-14T14:01:01+5:302022-09-14T14:07:31+5:30

Vande Bharat : नवीन वंदे भारत 2 ही अनेक बाबतीत विद्यमान वंदे भारतचे अपग्रेड आहे.

नवी दिल्ली : तुम्हीही बऱ्याचदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 30 सप्टेंबर रोजी रेल्वेकडून सेमी-हायस्पीड ट्रेन वंदे भारतची अपग्रेडेड व्हर्जन 'वंदे भारत 2' लाँच करण्याची तयारी सुरू आहे.

नवीन वंदे भारत 2 ही अनेक बाबतीत विद्यमान वंदे भारतचे अपग्रेड आहे. ही ट्रेन 30 सप्टेंबर रोजी अहमदाबादहून मुंबईसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नव्या वंदे भारतच्या प्रवासी भाड्याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी प्रवाशांना 2,349 रुपये मूळ भाडे (बेस फेअर) द्यावे लागेल, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. तर, चेअर कारचे मूळ भाडे 1,144 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.

नवीन वंदे भारत मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दोन स्थानकांवर थांबेल. यामुळे देशातील दोन आर्थिक शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. रेल्वेने निश्चित केलेल्या भाड्यात वंदे भारत प्रवाशांना शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांच्या मूळ भाड्याच्या 1.4 पट भरावे लागणार आहे.

अहमदाबाद ते सुरत या वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासचे मूळ भाडे 1,312 रुपये आणि चेअर कारसाठी 634 रुपये असणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सुरत ते मुंबईचे मूळ भाडे 1,522 रुपये आणि चेअर कारचे 739 रुपये असेल.

आयसीएफ चेन्नईने डिझाइन केलेले नवीन वंदे भारत कमाल 180 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. पण सध्या रेल्वे ट्रॅक 130 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाला सपोर्ट करत नाही.

सध्या वंदे भारत एक्सप्रेस देशातील दोन मार्गांवर धावते. यामध्ये पहिला मार्ग नवी दिल्ली ते कटरा आणि दुसरा मार्ग नवी दिल्ली ते वाराणसी असा आहे. नवीन वंदे भारत ट्रेन कमी वजनासह येतील आणि या ट्रेनमध्ये कॅटॅलिटिक अल्ट्रा व्हायलेट एअर प्युरिफिकेशन सिस्टम देखील असणार आहे.