CoronaVirus Live Updates : बापरे! ICU मध्ये कोरोनामुळे वृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू; AIIMS च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 03:41 PM2021-06-30T15:41:14+5:302021-06-30T15:56:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती ही समोर येत आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली झाली असून रुग्णांचा आकडा 3,03,62,848 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,98,454 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,951 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती ही समोर येत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ICU मध्ये कोरोनामुळे वृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू होत आहे.

AIIMS ने केलेल्या रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 65 वर्षीय लोकांपेक्षा 50 वर्षांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

रिसर्चनुसार, एम्समधील आयसीयूमध्ये 654 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील 247 जणांचा मृत्यू झाला आहे. ICU मधील कोरोनाचा मृत्यू दर हा 37.7 टक्के आहे. ज्यातील अधिक जण हे 18 ते 50 वर्षे वयोगटातील आहेत.

इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. रणदीप गुलेरिया, डॉ. राजेश मल्होत्रा यांच्यासह काही महत्त्वाच्या व्यक्तीचा समावेश आहे. 4 एप्रिल ते 24 जुलै 2020 मध्ये हा रिसर्च करण्यात आला आहे.

ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 42.1 टक्के लोक 18 ते 50 वयोगटातील, 34.8 टक्के लोक हे 51 ते 65 वयोगटातील आणि 23.1 टक्के लोक हे 65 वर्षांहून अधिक वयोगटातील होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे.

WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी Delta Variant हा कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा प्रकार घातक असून निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो असं देखील म्हटलं आहे.

"पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातील जवळपास 85 देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे."

"आपण सर्वांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या व्हायरलाला रोखायचं असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा" असं देखील टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

टेड्रॉस यांनी व्यापक लसीकरणाची गरज व्यक्त केली आहे. हे लसीकरण जगातील सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, अस त्यांनी नमूद केलं. यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

"तुम्ही या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला गर्दी दिसेल. जणूकाही साथ नाहीच आहे. मग तुम्ही ज्या देशांमध्ये लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाऊन दिसेल" असं टेड्रॉस यांनी सांगितलं.

ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल 35 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 1,11,157 वर पोहोचली आहे.