एहसान फरामोश मालदीव! भारतीय सैनिक तिथे कब्जा करायला नाही गेलेत; काय करतात जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:23 PM2024-01-16T12:23:00+5:302024-01-16T12:27:43+5:30

एकही युद्ध लढणारा सैनिक नाहीय, भारताने दोन हेलिकॉप्टर, एक टेहळणी विमान दिलेय. त्याचा आणि वैद्यकीय स्टाफ तिथे आहे.

भारत आणि मालदीवमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा तणाव वाढलेला आहे. भारतद्वेष्ट्या नेत्याला मालदीवची सत्ता मिळाली आहे, यामुळे या नेत्याने भारताने आजवर केलेले उपकार विसरून चीनच्या मांडीवर जाऊन बसण्यास सुरुवात केली आहे. या नेत्याला मालदीवमधील भारतीय सैनिकांची उपस्थिती देखील खटकत आहे.

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या देशात असलेल्या भारतीय सैनिकांना माघारी बोलविण्याचा भारताला अल्टीमेटम दिला आहे. चिनी समर्थक असलेले मुइज्जू यांनी निवडणूक जिंकल्यावर अनेकदा याचा पुनरुच्चार केला आहे. भारतीय सैन्याला एवढा विरोध कशासाठी? असे किती सैनिक मालदीवमध्ये आहेत? ते तिथे काय करतात? हे समजल्यावर तुम्ही देखील एहसान फरामोश मालदीव म्हटल्याशिवाय राहणार नाही.

भारताचे केवळ ७७ सैनिक मालदीवमध्ये तैनात आहेत. त्यापैकी एकही युद्ध लढणारा सैनिक नाहीय हे विशेष. मालदीव आजवर भारताकडून मदतच घेत आला आहे. भारताला वापरून घेत आला आहे. आता चीन धार्जिने सरकार येताच मालदीवने भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे.

हे ७७ सैनिक तिथे काय करतायत? यामध्ये फ्लाईंग क्रू, टेक्निकल स्टाफ, मेडिकल स्टाफ आणि ट्रेनर आहेत. जे मालदीवच्या सैन्याला ट्रेनिंग देतात, संकटकाळात वैद्यकीय मदत देखील करतात. महत्वाची बाब म्हणजे दोन भारतीय हेलिकॉप्टर आणि एक सागरी पाळत ठेवणारे ड्रोनियर विमानही तिथे तैनात आहे.

भारताने मालदीवला ही दोन विमाने भेट दिली होती. याशिवाय विशेष आर्थिक क्षेत्रावरही हे सैनिक लक्ष ठेवून असतात. ही हवाई मालमत्ता पूर्णपणे मालदीवच्या नॅशनल डिफेंस फोर्सच्या नियंत्रणात आहे. या हेलिकॉप्टरचे संचलनही तेच करतात. एका हेलिकॉप्टरमध्ये २ जवान असतात, दुसऱ्या हेलिकॉप्टरसाठी २६ आणइ ड्रोनियर विमानासाठी २५ जवान तैनात असतात. याशिवाय मेन्टेनन्ससाठी दोन जवान तैनात आहेत.

या तुकडीने आतापर्यंत 600 हून अधिक वैद्यकीय मदत, शोध आणि बचाव मोहिमा पार पडल्या आहेत. या मोहिमांच्या माध्यमातून खोल समुद्रात जीवन आणि मृत्यू यांच्यात झुलत असलेल्या लोकांची अनेक वेळा सुटका करण्यात आली आहे, असे या मोहिमांशी संबंधीत सुत्रांनी सांगितले आहे.

मालदीवमध्ये भारतीय लष्कराच्या कोणत्याही लढाऊ बटालियनचे सैनिक तैनात नाहीत, जे युद्ध किंवा तत्सम गोष्टी करू शकतात. बहुतेक भारतीय सैनिक हेलिकॉप्टर आणि विमानांच्या देखरेखीसाठी आणि देखभालीसाठी तैनात आहेत.

एवढेच नाही तर भारताने मालदीवला किनारी भागात रडार नेटवर्क उभारण्यातही मोठी मदत केली आहे. मालदीवमध्ये अशी १० रडार केंद्रे स्थापित करण्यात आली आहे. ही देखील मालदीवच्या लष्कराच्या ताब्यात आहेत. भारत फक्त या लोकांना प्रशिक्षण देण्याचे काम करतो.

भारत अनेक दशकांपासून मालदीवच्या लष्कराचा प्रशिक्षण भागीदार आहे. मालदीवच्या लष्करी प्रशिक्षणाच्या ७० टक्के गरजा भारत पूर्ण करतो. गेल्या 10 वर्षांत मालदीवच्या 1,500 सैनिकांना भारतात प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एवढी मदत करूनही मालदीवच्या सरकारला तेथील बहुपयोगी भारतीय सैनिकांची उपस्थिती खटकत आहे. मुइज्जू यांनी १५ मार्चपर्यंत या सैनिकांना भारतात जाण्यास सांगितले आहे. अनेक वर्षांचे चांगले संबंध जरी असले तरी ते एका नेत्याच्या अट्टाहासामुळे बिघडत चालले आहेत. जे पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागेल किंवा मालदीवच्या लोकांना मुइज्जू यांची सत्ता उलथवून टाकावी लागणार आहे.