Corona Vaccine : चिंता वाढली! 6 महिन्यांनंतर प्रभावी ठरत नाही 'कोरोना लस'; AIIMS च्या रिसर्चमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:37 PM2022-07-05T14:37:35+5:302022-07-05T14:56:16+5:30

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,086 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,25,233 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशभरात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोना लसीबाबत जगभरात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्लीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की सहा महिन्यांनंतरही अँटी-कोरोना लसीचा मानवी शरीरावर तितकासा परिणाम होत नाही. त्याचा प्रभाव कमी होतो.

एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एका अभ्यासात असे समोर आले आहे की कोरानाच्या दोन्ही डोस घेतल्यानंतर, ही लस सुमारे दोन आठवडे ते दोन महिने ओमायक्रॉनपासून संरक्षण करण्यास मदत करते. या कालावधीत त्याचा प्रभाव 52.2 टक्क्यांपर्यंत टिकतो.

एम्सने हे संशोधन स्वत:च्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर केले. या संशोधनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती कारण त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, जेणेकरुन संशोधनाचे परिणाम अधिक प्रभावी ठरतील.

संशोधनात, एम्समधील ओमायक्रॉन संसर्गादरम्यान रुग्णालयातील 11,474 आरोग्य कर्मचाऱ्यांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये मेडिकलचे विद्यार्थी, निवासी डॉक्टर, वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर कामगारांचा समावेश होता.

वारंवार होणाऱ्या ओमायक्रॉन संसर्गावर या लसीचा प्रभाव लक्षात घेणे हा त्याचा उद्देश होता. यामध्ये सहभागी असलेल्या 83 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. यापैकी 88 टक्के लोकांनी कोवॅक्सिन आणि 11 टक्के लोकांनी कोविशील्ड लस घेतली होती.

ओमायक्रॉन संसर्गाच्या वेळी, एम्सच्या 2527 आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान, सुमारे 28.40 टक्के (1007) आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा ओमायक्रॉन संसर्गाची लागण झाली.

कोरोना संसर्गातून वाचलेले आरोग्य कर्मचारी. त्यापैकी 1520 आरोग्य कर्मचारी म्हणजेच 19.17 टक्के ओमाक्रॉन संसर्गाचे बळी ठरले आहेत. यापैकी 98.4 टक्के सौम्य संसर्ग आणि 1.6 टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये मध्यम पातळीवरील संसर्ग आढळून आला.

अभ्यासात असे आढळून आले की 14 ते 60 दिवसांपर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना ओमाक्रॉनचे संक्रमण कमी आढळले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीचा परिणाम त्यांच्यावर 52.5 टक्के प्रभावी ठरला आहे.

दुसरीकडे, ज्यांनी 61 ते 120 दिवस लस घेतली, त्यांच्यावर लसीचा परिणाम हा 35.2 टक्के होता, तर आरोग्य कर्मचार्‍यांवर 121 ते 180 दिवसांदरम्यान कोरोना लसीचा परिणाम हा 29.4 टक्के होता.

अभ्यासात असे दिसून आले की जसजसा वेळ जातो तसतसा लसीचा प्रभाव देखील कमी होतो. यामुळे, सहा महिन्यांनंतर, ही लस ओमायक्रॉनवर तितकी प्रभावी नाही. सहा महिन्यांनंतर, लसीचा कोणताही विशेष परिणाम आढळला नाही.

सहा महिन्यांहून अधिक काळ लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनची जास्त लागण झाल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथ-ईस्ट एशियानेही एम्सचा हा अभ्यास गांभीर्याने घेतला आहे आणि तो आपल्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

अभ्यासात सहभागी मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद कुमार म्हणतात की, या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, लस घेतल्यानंतर तीन ते चार महिने उलटून गेले असतील, तर धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्यांना आरोग्य कर्मचार्‍यांनी डोस घ्यावा, परंतु हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की हा डोस निर्धारित वेळेपूर्वी घेऊ नये.

अल्फा, डेल्टा, गामा किंवा ओमायक्रॉनच्या इतर कोणत्याही प्रकाराचा संसर्ग झाल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, असेही अभ्यासात आढळून आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.