CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! कडुलिंबाने कोरोनावर उपचार, अँटी व्हायरल औषध करणार कमाल; रिसर्चमध्ये मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:14 AM2022-03-02T11:14:33+5:302022-03-02T11:35:53+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कडुलिंब आता कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरणार आहे. यापासून अँटी व्हायरल औषध तयार केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,554 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे देशभरात तब्बल 5 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा 5,14,023 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे.

बुधवारी (2 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे सात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. संशोधनातून महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. कडुलिंब आता कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरणार आहे. यापासून अँटी व्हायरल औषध तयार केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींवर औषध म्हणून वापरला जाणारा कडुलिंब आता कोरोनावरही उपचार करू शकतो. भारत आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा आहे की कडुलिंबाची साल कोरोनाचा संसर्ग रोखू शकते आणि त्याचा प्रभाव कमी करू शकते.

प्राण्यांवर केलेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळून आले आहे की कडुनिंबाच्या सालाच्या रसाचा कोरोना संक्रमित फुफ्फुसांवर परिणाम होतो, ज्यामुळे व्हायरसची होणारी वाढ आणि संसर्गाचा प्रभाव कमी होतो.

युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो एनशूट्ज मेडिकल कँपस आणि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, कोलकाता यांच्या शास्त्रज्ञांनी संगणक मॉडेलिंगद्वारे आढळले की कडुनिंबाच्या सालाचा रस व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला चिटकण्यासाठी सक्षम आहे.

कोरोना व्हायरस त्यामुळे माणसाच्या शरीरातील होस्ट सेल्स संक्रमित करू शकणार नाही. व्हायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी कोरोनावर कडुनिंबावर आधारित औषध बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रत्येक वेळी नवीन कोरोना व्हेरिएंट आल्यावर नवीन उपचार विकसित करू नयेत, अशी आम्हाला आशा आहे, असे ते म्हणाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

शास्त्रज्ञ मारिया नेगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घसा दुखत असताना आपण ज्या प्रकारे पेनिसिलिन गोळी खातो, त्याचप्रमाणे कोरोनाच्या बाबतीत कडुनिंबापासून बनवलेले औषध वापरले जाईल. यामुळे गंभीर संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कडुनिंबाच्या सालाच्या रसातील कोणता घटक कोरोनाविरूद्ध काम करतो हे सध्या तपासले जात आहे. यानंतर, कडुलिंबापासून अँटी व्हायरल औषध बनवून त्याचा डोस ठरवला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.