कोरोना हाय! शिक्षक पास करतील म्हणून विद्यार्थ्यांची क्लुप्ती; थेट नापास झाले

By हेमंत बावकर | Published: October 24, 2020 06:30 PM2020-10-24T18:30:20+5:302020-10-24T18:35:08+5:30

Corona Virus School Exam: कोरोनामुळे आधीच निम्मा अभ्यासक्रम देण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांवर बोजा पडू नये असा उद्देश होता.

कोरोना काळामध्ये शिक्षण देखील ऑनलाईन दिले जात आहे. तसेच परिक्षाही घेण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना असल्याने विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वासाने क्लुप्ती लढविली, मात्र, ती त्यांच्या अंगलट आली असून त्यांना थेट नापास करण्यात आले आहे. पंजाबच्या चंदीगढमध्ये हा प्रकार घडला आहे.

काही दिवसांपूर्वी इयत्ता नववीची कंपार्टमेंट परिक्षा घेण्यात आली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकाच रिकामी सोडली. तर अन्य विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविले परंतू ते सोडविलेच नाहीत अशाप्रकारे लिहिले.

सरकारी शाळांच्या शिक्षकांनी सांगितले की, कोरोनामुळे आधीच निम्मा अभ्यासक्रम देण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांवर बोजा पडू नये असा उद्देश होता.

यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सोपे जावे आणि जादा संख्येने विद्यार्थी पास व्हावेत असा उद्देश होता. मात्र, झाले उलटेच.

93 शाळांपैकी 38 शाळांचे सर्वच्या सर्व विद्यार्थी फेल झाले आहेत. जीएमएचएस-29ए मध्येच यंदा नववीचे विद्यार्थी पास झाले आहेत.

चंदीगढच्या 93 सरकारी शाळांमध्ये 3950 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. अंतिम निकालानंतर सहा महिन्य़ांनी परिक्षा जाहीर करण्यात आली होती. यामध्ये केवळ 401 विद्यार्थीच पास झाले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अपुरे उत्तर लिहिले आणि उत्तर पत्रिका कोरी सोडल्याचे कारण विचारले असता त्यांनी कोरोना आहे, असे सांगितले.

कोरोना आहे, यामुळे परिक्षा होणार नाही. शिक्षक पास करतील, असे आम्हाला वाटल्याचे ते म्हणाले.

परिक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शिक्षण विभागाने जादा क्लास घेतले होते. मात्र, त्यालाही विद्यार्थ्यांचा तेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता.

धक्कादायक म्हणजे कोरोना असल्याने 30 ग्रेस मार्क देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. रुबिंदर जीत सिंह बराड़ यांनी सांगितले की, जास्तीत जास्त विद्यार्थी पास व्हावेत व पुढील वर्गात जावेत यासाठी हे मार्क देण्याचे आदेश दिले होते.

शिक्षण विभागाने परिक्षेच्या आठवडाभर आधी वेळाप्रत्रक जाहीर केले होते. तसेच वेळेत परिक्षा न घेतल्याने विद्यार्थी गाफिल राहिले व त्यांना वाटले की पेपर होणार नाहीत.