क्रिकेट, सिनेमाला सक्त विरोध, इंदिरा गांधींना केली होती अटक, अशी होती चरण सिंह यांची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 02:37 PM2024-02-09T14:37:36+5:302024-02-09T14:41:26+5:30

Chaudhary Charan Singh: भारताचे माजी पंतप्रधान तसेच जाट आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून लौकिक मिळवलेल्या चौधरी चरण सिंह यांना आज केंद्र सरकारने भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या चरण सिंह यांची कारकीर्द विविध कारणांमुळे गाजली होता. त्यातील काही महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला हा आढावा.

भारताचे माजी पंतप्रधान तसेच जाट आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून लौकिक मिळवलेल्या चौधरी चरण सिंह यांना आज केंद्र सरकारने भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या चरण सिंह यांची कारकीर्द विविध कारणांमुळे गाजली होता. त्यातील काही महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला हा आढावा.

२३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशमधील एका गावात जन्मलेल्या चौधरी चरण सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वकिलीमधून केली होती. त्यानंतर ते महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या चरण सिंह यांनी पुढे विविध पक्षांच्या माध्यमातून राजकारण केले.

१९५१ मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री बनलेल्या चरण सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून १९५९ मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना विरोध करण्यासही मागे पुढे पाहिले नाही.

साधेपणा हे चरण सिंह यांच्या जीवनाचं खास वैशिष्ट्य होतं. त्यांचा क्रिकेट आणि चित्रपटांना सक्त विरोध होता. या गोष्टींमुळे वेळेचा अपव्यय होतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तर मद्यमान करणाऱ्या व्यक्ती त्यांना आवडत नसत. अशा व्यक्तींना ते आजबाजूलाही उभे करत नसत.

चौधरी चरण सिंह यांनी १९६७ मध्ये काँग्रेस सोडली. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. विविध पक्षांच्या आघाडीच्या पाठिंब्याने त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले.

दरम्यान, १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये चरण सिंह यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली. मात्र त्यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आले. याच काळात चरण सिंह यांनी इंदिरा गांधी यांना आणीबाणीच्या काळातील विविध आरोपांखाली अटक करवली होती.

मात्र नंतर जनता पक्षात मतभेद झाल्यानंतर चरण सिंह यांनी इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारत पंतप्रधानपद मिळवलं. पण हे पत औटघटकेचं ठरलं. सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच इंदिरा गांधी यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे चरण सिंह यांना राजीनामा द्यावा लागला.