सलाम ! अवनी चतुर्वेदी ठरली लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 01:47 PM2018-02-22T13:47:58+5:302018-02-22T13:50:38+5:30

भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.

19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं.

अवनीचं शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यातील एका छोट्या गावात देऊलंद येथे झालं आहे. 2014 मध्ये तिने राजस्थानच्या बनस्थली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर तिने भारतीय हवाई दलाची परिक्षा उत्तीर्ण केली.

अवनी चतुर्वेदीचा जन्म 27 ऑक्टोबर 1993 रोजी झाला आहे. तिचे वडिल दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारमध्ये जलसंवर्धन विभागात कार्यकारी अभियंता आहेत, तर तिची आई गृहिणी आहे.

महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी 2016 मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात कमिशन केलं होतं.