चिंताजनक! गुलमर्गमधून बर्फ गायब, काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यात दिसतंय उजाड चित्र, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:42 PM2024-01-09T13:42:23+5:302024-01-09T13:46:13+5:30

No Snowfall In Kashmir: गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर पडत आहे. पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्येही कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र काश्मीरच्या खोऱ्यामध्ये थंडीच्या दिवसात पडणारा पाऊस गायब झाला आहे. हिवाळ्यात पांढऱ्या बर्फाची चादर ओढून घेणाऱ्या गुलमर्गमध्येही बर्फ शोधून सापडत नाही आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर पडत आहे. पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्येही कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र काश्मीरच्या खोऱ्यामध्ये थंडीच्या दिवसात पडणारा पाऊस गायब झाला आहे. हिवाळ्यात पांढऱ्या बर्फाची चादर ओढून घेणाऱ्या गुलमर्गमध्येही बर्फ शोधून सापडत नाही आहे.

हिवाळ्यातील हिमवृष्टी आणि स्कीईंगसाठी काश्मीर प्रसिद्ध आहे. मात्र यंदाच्या हिवाळ्यात काश्मीरमध्ये अनालकनीय कोरड्या ऋतूचे चित्र दिसत आहे. हिमवृष्टी आणि पाढंऱ्या बर्फाच्या चादरीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमधील दऱ्याखोऱ्या उजाड भासत आहेत. काश्मीरमध्ये संपूर्ण डिसेंबर महिन्यात तब्बल ७९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर हिमवृष्टी अद्यापही झालेली नाही.

हवामान तज्ज्ञांनी हिमवृष्टी न होण्यामागे अल नीनो हे कारण असल्याचे सांगितले. त्यामुळे पाऊस आणि हिमवृष्टी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. अल नीनोमुळे जागतिक पातळीवरील हवामान प्रभावित होत असते. काश्मीरमधील पर्जन्यमानावरही त्याचा परिणाम होत असतो.

काश्मीरमधील हवामान विज्ञान केंद्राचे संचालक मुख्तार अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा कोरडा राहिला आहे. आतापर्यंत जो अंदाज होता त्यानुसार हवामानाची स्थिती किमान १२ जानेवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये येथे मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे.

काश्मीरमध्ये अल नीनोचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत कोरडा आणि सौम्य हिवाळा आणि कमी हिमवृष्टीच्या रूपात दिसू शकतो. तसेत काश्मीर खोरे भविष्यात दीर्घकाळ कोरड्या ऋतूचा सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम शेतीवरही होणार आहे.

काश्मीरमध्ये येणारे पर्यटक हिवाळ्यातील महिने आणि हिमवृष्टीची वाट पाहत असतात. पर्यटकांसाठी काश्मीरमधील गुलमर्ग हे मुख्य केंद्र आहे. मात्र यावेळी बर्फवृष्टी न झाल्याने पर्यटक निराश झाले आहेत.

जम्मू-काश्मीरची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकांकडून गुलमर्ग आणि पहलगाममध्ये तुलना करत असतात. मात्र जर बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर पहलगामपेक्षा गुलमर्ग अधिक वरचढ आहे. मात्र यावेळी बर्फवृष्टीवर अल नीनोचा प्रभाव दिसत आहे.