भारतात घडली 'टायटॅनिक'सारखी घटना; 1947मध्ये मुंबईजवळ जहाज बुडून 700 जणांचा मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 03:31 PM2023-06-23T15:31:20+5:302023-06-23T15:36:04+5:30

टायटॅनिक जहाजाबद्दल सर्व जगाला माहिती आहे, पण मुंबईजवळ झालेल्या अपघाताची क्वचितच कुणाला माहिती असेल.

Titan Submarine: अटलांटिक समुद्रात बुडालेल्या 'टायटॅनिक' जहाजाला पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी बुडाल्याची घटना घडली. या घटनेत 5 अब्जाधिशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे 1912 मध्ये बुडालेली 'टायटॅनिक' पुन्हा एकदा चर्चेत आली. टायटॅनिकवर 2200 प्रवासी स्वार होते, तर त्यातील 1500 लोकांचा मृत्यू झाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतामध्येही 'टायटॅनिक'सारखीच घटना घडली आहे. भारतात घडलेल्या घटनेत सुमारे 700 लोकांचा मृत्यू झाला होता.

मुंबईच्या समुद्रात बुडालेल्या जहाजाचे नाव 'एसएस रामदास' होते. मीडिया रिपोर्टनुसार, रामदास जहाज बनवण्याचे काम स्वान आणि हंटर कंपनीने केले होते. याच कंपनीने राणी एलिझाबेथचे जहाज बांधले होते. 1936 मध्ये तयार झालेल्या रामदासची लांबी 179 मीटर आणि रुंदी 29 फूट होती. यात 1000 प्रवासी प्रवास करू शकत होते. विशेष म्हणजे ही घटना अशा वेळी घडली जेव्हा, भारताला स्वातंत्र्य मिळायला फक्त एक महिना उरला होता.

एसएस रामदास जहाज मुंबईवरुन रेवसला जाणार होते. जहाजावर 778 लोक होते. 17 जुलै 1947 रोजी सकाळी 8 वाजता मुंबईतून प्रवास सुरू झाला. मच्छीमार आणि छोट्या व्यापाऱ्यांसह काही ब्रिटीश अधिकारीही त्यांच्या कुटुंबीयांसह जहाजावर होते.

शिटी वाजवताच जहाज निघाले, पण 13 किमी अंतरावर पोहोचताच पावसाचा जोर वाढला. हळूहळू जहाजात पाणी भरू लागले. अचानक जहाज एका बाजूला झुकले. जहाजावर फार कमी लाइफ जॅकेट्स होती, त्यामुळे लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते.

ज्यांना पोहायला येते, त्यांनी पाण्यात उड्या मारल्या. रामदास एका बेटावर पोहोचले, तेव्हा एका मोठ्या लाटेने जहाजाला दुसरीकडे वळवले, लगेच आणखी एक लाट आली आणि जहाज पूर्णपणे बुडाले. भारताच्या सागरी इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात आहे. सकाळी नऊच्या सुमारास जहाज पाण्यात बुडाले, पण मुंबईत संध्याकाळी 5 वाजता घटना समजली. या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांनी मुंबईत येऊन अपघाताची माहिती दिली. या दुर्घटनेत काही जणांचे मृतदेहही सापडले नाही.

विशेष म्हणजे, या अपघातापूर्वी याच मार्गावर आणखी दोन जहाजा बुडाले होते. रामदासच्या आधी, एसएस जयंती आणि एसएस तुकाराम 11 नोव्हेंबर 1927 रोजी बुडाले होते. जयंतीतील 96 जणांचा मृत्यू झाला, तर तुकाराममधील 48 जण बुडाले. सुदैवाने 96 जणांचे प्राण वाचले. त्या घटनेच्या 20 वर्षांनंतर रामदासचा याच मार्गावर अपघात झाला.