Vidhansabha: 'महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:04 PM2022-08-24T17:04:50+5:302022-08-24T17:28:57+5:30

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार ५० खोके एकदम ओक्के हा नारा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार ५० खोके एकदम ओक्के हा नारा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले.

परंतु आज सत्ताधारी पक्षाचे आमदारही राष्ट्रवादी-शिवसेनेविरोधात नारेबाजी करत होते. अधिवेशनापूर्वी शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असताना विरोधकही तेथे उपस्थित झाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राडा झाला.

या गोंधळात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र इतर आमदारांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकारावर आमदार महेश शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अतिशय चांगले काम करतंय. परंतु गेल्या ६ दिवसांपासून विरोधी पक्षाचे आमदार आंदोलन करताना वेगवेगळे आरोप करत होते.

त्याला उत्तर देण्यासाठी आमचे प्रतोद भरत गोगावले यांच्या नेतृत्वात आमदारांची बैठक झाली. या बैठकीत विरोधकांच्या निषेधार्थ आंदोलन करायचं ठरलं असं त्यांनी सांगितले. मात्र, या आंदोलनाच्या खेळात चांगलाच राडा महाराष्ट्राच्य जनतेनं पाहिला.

आमदार अमोल मिटकरी आणि आमदार महेश शिंदे यांच्या चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही आमदार एकमेकांना भिडल्याचं व्हिडिओत दिसून आले. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र, दोघांनीही स्वत:ला प्रश्न विचारण्याची खरी गरज आहे. आ. शिंदे यांनी मिटकरींवर जबरी टिका केली आहे.

आमचे विरोधक घोषणा देत आम्हाला चिथावत होते, आज आम्ही सर्व आमदारांनी आमची भूमिका मांडण्यासाठी आंदोलन करत होतो. शांततेनं आमची भूमिका मांडत होतो, त्याचवेळी काही विधिमंडळ सदस्य, विधानसभा सदस्या पाठिमागून घोषणा देत आले. आमच्या आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला, हे अशोभनीय वर्तन आहे.

'महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विधिमंडळातील आज त्यांचा गोंधळ सर्वांनीच पाहिला आहे, मीडियाने पाहिलंय. आम्ही शांतपणे आलो होतो, आम्हाला धक्काबुक्की केली, ढकलून देण्यात आलं.

अमोल मिटकरींनीच ढकलंल, म्हणूनच त्या कामाला सुरुवात झाली. अमोल मिटकरी हा लोकशाहीवादी नेता नाही, त्यांचे जहाल विचार आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी माझी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी आहे, असेही शिंदे म्हणाले.

दरंम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनीही शिंदे गटाच्या नेत्यांवरच आरोप केले आहेत. या घटनेला शिंदे गटाचे आमदारच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, आमदार महेश शिंदेंमुळेच हा गोंधळ झाल्याचंही ते म्हणाले.