Raj Thackeray: मारुती स्त्रोत्र नाही, तर हनुमान चालीसा का?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:57 AM2022-04-30T11:57:50+5:302022-04-30T12:01:11+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण पेटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात भोंग्याचा विषय मांडल्यानंतर राज्यभरात यावरून वादंग पेटलं. ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरेंच्या हनुमान चालीसावरून विरोधकांनी मनसेवर टीकास्त्र सोडलं. हनुमान चालीसा का? असा प्रश्न निर्माण करत मनसेच्या मराठी भूमिकेवर शंका घेतली. विरोधकांच्या या प्रश्नावर राज ठाकरेंनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. हनुमान चालीसा का? असा प्रश्न शर्मिला ठाकरेंनीही राज यांना विचारला होता.

तेव्हा राज म्हणाले की, माझी इच्छा होती देशातील मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवले पाहिजे. हा विषय फक्त मुंबईपुरता नाही. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंनी हा विचार करणं गरजेचा आहे. देशभरात सर्वांना होणारा त्रास आहे. मी दुबईत गेलो त्याठिकाणी कधी असं पाहिलं नाही. तिथे भोंगे लावल्याचं पाहिलं नाही.

राज ठाकरेंच्या हनुमान चालीसेच्या इशाऱ्यावरून राज्यभरात अनेक संघटनांनी विरोध केला. हनुमान चालीसा म्हणण्याची राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागली. कुणी व्यासपीठावरून तर कुणी पत्रकार परिषदेतून हनुमान चालीसा म्हणू लागले.

देशहितासाठी संबंध तुटले तरी तुटून भूमिका सोडायची नाही असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कुठलाही विचार नव्हता असंही म्हटलं.

राज ठाकरे शिवसेना सोडणार हे आम्हालाही सांगितलं नव्हतं. मला त्याने विचारलं मी शिवसेनेतून बाहेर पडतोय तू साथ देणार का? त्यावेळी कुटुंबाने राज ठाकरेंना खूप साथ दिली असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर राज ठाकरे म्हणाले की, मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा नवीन राजकीय पक्ष काढावा याचा विचारही मनात आला नव्हता.

बाळासाहेब असताना त्यांच्यासमोर नवीन राजकीय पक्ष स्थापन करणं गमंत आहे का? १९९९-२००२ मी पूर्णपणे शिवसेनेतून बाहेर होतो. यातून बाहेर पडायचं हे मी ठरवलं. मात्र काही काळानंतर या सर्व गोष्टी अति व्हायला लागल्या.

मी जिल्हावार जायला सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्यातून मला जो प्रतिसाद मिळत राहिला. त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. मी ३७ वर्षाचा होता. सर्व एकदम अंगावर आलं होतं. कार्यकर्त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या म्हणून पुढे पक्ष स्थापन करण्याचा विचार ठरवलं.

मनसेच्या आंदोलनामुळे मराठी शिकले. मराठीच्या आग्रहामुळे अनेकजण मराठी बोलायला लागले. अमिताभ, आमिर मराठीत बोलायला लागले. अनेकांचा मेसेज मला मराठीतून येतो. मला पण मराठी येते अशी चढाओढ फिल्म इंडस्ट्रीत झाली.

मराठी वर्ग लावून आमिर खान मराठीत बोलतो. सलमान खान मराठीतून बोलतो. त्याची आई मराठी आहे. सगळ्यांना सगळं माहितं होतं. पण मनसेच्या मराठी आंदोलनानंतर मराठी शिकण्याची जाणीव निर्माण झाली असंही राज ठाकरेंनी सांगितले.