नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:33 PM2023-01-13T13:33:32+5:302023-01-13T13:44:14+5:30

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राज्यात पुन्हा राजकीय नाट्य घडलं आहे. या निवडणुकीत अखेरपर्यंत सस्पेन्स ठेवण्यात आला. त्यानंतर काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली. परंतु विभागीय कार्यालयात जाऊनही तांबे यांनी अर्ज भरला नाही.

सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरला. मात्र आपण अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. मला पाठिंबा देण्यासाठी भाजपाला पाठिंबा मागणार असल्याचं सांगत सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केले.

गेल्या १३ वर्षापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असून यंदाही काँग्रेस विजयी होईल असं मानलं जात होते. परंतु सुधीर तांबे यांनी अखेरच्या क्षणी पुत्रासाठी माघारी घेत सत्यजित तांबेंना अपक्ष म्हणून पुढे केले. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला. तांबेंनी पक्षाची फसवेगिरी केली असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला.

त्यात या संपूर्ण घडामोडीत सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात कुठे होते असा प्रश्न उभा होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तांबेंना भाजपाकडून उमेदवारी नको, म्हणून बाळासाहेब थोरातांनी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याला फोन करून विनंती केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने पुढे आले आहे.

बाळासाहेबांच्या थोरातांच्या विनंतीनंतरच थेट भाजपा प्रवेश न करता सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी भरली. जर कौटुंबिक कलह असेल तर आम्ही चर्चेच्या माध्यमातून तो सोडवू. थोरातांची कन्याही राजकीय क्षेत्रात येण्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यामुळे थोरात-तांबे कुटुंबात कलह होण्याची शक्यता होती.

सत्यजित तांबे यांचा भाजपा प्रवेश, उमेदवारी दिली तर पुढे अडचणीचं ठरू शकते त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती केली. त्यानंतर नाशिकच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडीनंतर अनेकांना धक्का बसला.

नाशिक पदवीधर निवडणुकीतील या संपूर्ण घडामोडीनंतर बाळासाहेब थोरात संपर्कात होते का अशी विचारणा पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना केली. तेव्हा काल दुपारपर्यंत ते संपर्कात होते. पण त्यानंतर संपर्कात नाही असंही स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या 'सिटीझनविल' नामक पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासूनच तांबे यांना भाजपाने गळ टाकल्याची चर्चा होती

भाजपने सत्यजित तांबेंना पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. परिणामी डॉ. तांबे यांना काँग्रेसने उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शविला असतानाही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत वाट पाहिली, तर भाजपनेदेखील अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही.

कॉंग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यावी यासाठी डॉ. सुधीर तांबे यांनी प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही, तर दुसरीकडे भाजपा सत्यजित यांना उमेदवारी देण्यास तयार असल्याने डॉ. तांबे यांनी माघार घेत पुत्राला चाल दिली मात्र भाजपाने पिता-पुत्रात फूट पाडल्याची चर्चाही रंगली आहे.