दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:44 PM2024-03-28T18:44:28+5:302024-03-28T18:48:57+5:30

Karthik Madhira: तुम्ही आतापर्यंत अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या अधिकाऱ्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आयपीएस बनण्यासाठी आपल्या क्रिकेटमधील करिअरचा त्याग केला आणि अभ्यास करून आपलं स्वप्न साकार केलं.

तुम्ही आतापर्यंत अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या अधिकाऱ्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आयपीएस बनण्यासाठी आपल्या क्रिकेटमधील करिअरचा त्याग केला आणि अभ्यास करून आपलं स्वप्न साकार केलं.

या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे कार्तिक मधिरा. ते हैदराबाद येथील राहणारे आहेत. त्यांनी १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील आणि विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळले होते. त्यांची क्रिकेटमधील वाटचाल योग्न दिशेने सुरू होती. मात्र एका अनपेक्षित घटनेनं त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली.

कार्तिक मधिरा यांनी आयपीएस बनण्यापूर्वी जेएनटीयूमधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवली होती. मात्र काही वैयक्तिक कारणं आणि दुखापतीमुळे त्यांना क्रिकेटपटू बनण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

सुरुवातीच्या प्रावसात ते बरेच अडखळले. मात्र त्यांनी हिंमत हरली नाही. तीन वेळा पूर्व परीक्षेत त्यांना अपयश आले. मात्र त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. अखेर २०१९ मध्ये त्यांनी देशभरातून १०३ वा क्रमांक मिळवला. चौथ्या प्रयत्नामध्ये त्यांना हे यश मिळाले.

आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाला आहे. क्रिकेटपासून दूर झाले तरी त्यांचं क्रिकेटवरील प्रेम कमी झालेलं नाही.