माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात झाला; देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घेत खुलासा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 07:38 PM2023-02-13T19:38:59+5:302023-02-13T19:41:31+5:30

२०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण संपूर्ण बदलून गेले. एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेला भाजपा-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून दुरावा निर्माण झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली.

उद्धव ठाकरेंच्या या खेळीनं भाजपाला जबर धक्का बसला. राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागले. तर पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले.

मात्र अडीच वर्षानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात विराजमान झाले.

राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात बोलताना मी बदला घेतला असा शब्दप्रयोग केला होता. यावर राजकीय तर्कवितर्क लढवले गेले. नेमकी काय परिस्थिती होती ज्यामुळे फडणवीसांना या वाक्याचा शब्दप्रयोग करावा लागला त्याबद्दल फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यासोबत विश्वासघात झाला तोही दोनदा झाला. पहिला विश्वासघात हा उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या. निवडून आले. निवडणुकीच्या काळात प्रत्येक भाषणात मोदी-शाह देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हा उद्धव ठाकरे टाळ्या वाजवत होते.

अनेक भाषणात उद्धव ठाकरेंनी माझा नेता म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर ज्यावेळी संख्याबळ त्यांच्या लक्षात आले आपल्याला मुख्यमंत्री बनता येते तेव्हा त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही असं फडणवीसांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. दुसरा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण ते आमच्यासोबत निवडून आले नव्हते असं फडणवीसांनी सांगितले.

ज्यावेळी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करतायेत हे लक्षात आले तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं म्हणून आपण सरकार तयार करू. राजकारणात एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो तेव्हा तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे.

राष्ट्रवादीसोबत चर्चा केली. जी काही चर्चा झाली ती शरद पवारांसोबत झाली. ती खालच्या पातळीवर झाली नव्हती. शरद पवारांसोबत जी चर्चा झाली. जे काही ठरले ते कसं बदललं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी आमचा विश्वास घात झाला असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

जो विश्वासघात झाला त्यातील पहिला विश्वासघात हा जास्त मोठा मी मानतो कारण तो आपल्या व्यक्तीकडून झाला होता. कारण ज्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या त्यांनी केलेला होता. त्यामुळे त्यानंतरचा विश्वासघात हा छोटा होता असं फडणवीसांनी म्हटलं.