Eknath Shinde: काय तो बंगला, काय ते मंत्रिपद, तुम्हीच सांगा; शिंदे-फडणवीसांचे धक्कातंत्र; मंत्र्यांकडेच 2-3 पर्याय मागितले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:49 AM2022-08-11T10:49:08+5:302022-08-11T11:07:17+5:30

Eknath Shinde Cabinet Expasion: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि बंगले वाटपावर लागले आहे. शिंदे रात्रीच वर्षा बंगल्याच्या डागडुजीची पाहणी करून आले.

शिंदे गटातील आमदारांवरील अपात्रतेची कारवाईबाबतची सुनावणी आणखी लांबली आहे. आता २२ ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. या चालढकलीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उरकून घेतला आहे. सारेकाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असल्याने शिंदेंनी सावध भूमिका घेतली होती. परंतू, ४० दिवस झाले तरी, अशी टीका होऊ लागल्याने आणि आमदारही अस्वस्थ झाल्याने अखेर विस्तार आटोपण्यात आला आहे.

भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळीच शिंदे गटाचे सर्व मंत्री शिवाजीपार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी गेले होते. बाळासाहेबांना अभिवादन करून कामकाजाला सुरवात करणार, असे दिपक केसरकर यांनी म्हटले. शपथ घेताना या आमदारांना बाळासाहेबांचा विसर पडल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली होती.

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि बंगले वाटपावर लागले आहे. मात्र, यातही मंत्र्यांमध्ये रुसवे फुगवे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तुम्हाला कोणते मंत्रिमंडळ आणि बंगला हवा आहे, असे विचारत दोन-तीन पर्याय मागितले आहेत.

यामुळे आज दिवसभरात या मंत्र्यांना आपल्या आवडीची खाती आणि आवडीचे बंगल्यांची नावे द्यावी लागणार आहेत. आता जवळपास सर्वच मंत्री हे फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते, यामुळे या मंत्र्यांना खाती आणि कोणता बंगला हवा याचे चांगलेच ज्ञान आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांना आधी राहत असलेलाच बंगला हवा की दुसरा कुठला? हे ठरवावे लागणार आहे.

भाजपाच्या मंत्र्यांना अडीच वर्षांपूर्वी बंगले सोडावे लागले होते. तर काहींना नव्यानेच मंत्रिपद मिळाले आहे. यामुळे या मंत्र्यांचा डोळ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या बंगल्यांवर असणार आहे. यामुळे आपल्या पसंतीचा बंगला मिळविण्यासाठी या मंत्र्यांमध्येच शर्यत लागण्याची शक्यता आहे.

मलईदार खात्यासाठी तर सारेच मंत्री 'अर्ज' करणार आहेत. महसूल, अर्थ, सा. बांधकाम ही खाती तर सर्वांनाच आवडीची असणार आहेत. यामुळे १८ पैकी १८ आमदारांची पहिली पसंती या खात्यांना असली तर नवल वाटायला नको. यामुळे मंत्रिपद वाटपावरून नाराजी नको म्हणून शिंदे फडणवीसांनी जरी मंत्र्यांना दोन तीन पर्याय देण्याचे म्हटले असले तरी त्यातून कोणाला कोणते खाते द्यायचे हे निवडणे या दोघांना कठीण जाणार आहे.

गृह खात्यावरून तर शिंदे- फडणवीसांमध्येच स्पर्धा रंगली आहे. यामुळे हे खाते भाजपाकडे की शिंदे गटाकडे हे देखील महत्वाचे असणार आहे. विखे पाटील सर्वात ज्येष्ठ असल्याने त्यांना मोठे खाते मिळेल. पण भाजपाच्या अन्य मंत्र्यांना कोणते खाते हवेय? त्यांना महत्वाची खाती मिळाली तर शिंदे गटाला परवडणार आहे का? मग ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसकडे ही खाती होतीच की, शिवसेनेच्या हाती पुन्हा भोपळा अशीच गत या शिंदे गटाची होणार आहे. फक्त हिंदुत्ववादी एवढाच काय तो फायदा त्यांना होणार आहे.

आधीच पहिल्या मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. बच्चू कडूंसारख्या अपक्षांनी तर ठाकरे सरकारमधील मंत्रिपद गमावून बसले आहेत. इतरांना आतातरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू, शिंदेंनी त्याच मंत्र्यांना निवडल्याने आणि सर्वांना कॅबिनेट दिल्याने आपल्या माथी काय? राज्यमंत्री पद तरी मिळेल का या धाकधुकीत उरलेले सारे शिंदे समर्थक आमदार आहेत.