एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते; आणखी एक मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:07 PM2022-09-29T12:07:06+5:302022-09-29T12:14:22+5:30

भाजपाला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेनेच्या १५ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं चंद्रकांत खैरेंनी दावा केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या समावेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते शक्य झालं नाही असं म्हटलं.

एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांबाबत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना कळालं, त्यानंतर शिंदेंनी माघार घेतली. जे आज आम्हाला सांगतायेत काँग्रेससोबत गेले परंतु आज गद्दारी करणारे एकनाथ शिंदे स्वत: काँग्रेससोबत जाणार होते त्याचं काय? शिंदे यांनी देवीच्या साक्षीने खरे सांगावे असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

शिंदे किती वेळा खोटं बोलून उद्धव ठाकरेंवर आरोप करणार आहात? आई जगदंबा त्यांना कधीही माफ करणार नाही. आज हे खोके कुठून आणले, कसे आणले? १० हजार बसेस मेळाव्याला पाठवणार आहेत. शिवसेनेशी जिद्द करणं तुम्हाला भारी पडणार आहे असा इशाराही खैरेंनी दिला.

शिवसेनेचे १०-१५ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मला संजय शिरसाट यांनी एकदा सांगितले होते. काँग्रेससोबत शिवसेना गेल्यावर तुम्हीही मंत्रिमंडळात होता. सगळ्यात मोठं खातं तुमच्याकडे दिले होते. मग इतकं असताना तुम्ही दोष देता. अडीच वर्षापूर्वी म्हणायला हवं मी काँग्रेससोबत जाणार नाही. मी बाहेर पडतो पण तेव्हा म्हटलं नाही असं खैरेंनी सांगितले.

आताची बंडखोरी हिंदुत्वासाठी नव्हे तर खुर्चीसाठी होतं. शिंदेंना खुर्ची हवी होती असा आरोप खैरेंनी केला. दसरा मेळाव्याला किती गर्दी जमणार याचा आकडा सांगणार नाही. दरवर्षी मेळाव्याला आपापल्या सोयीने जातात. भाकरी घेऊन शिवसैनिक मेळाव्याला येतात. आमच्याकडे खोके संस्कृती नाही असं खैरेंनी म्हटलं.

खैरेंनी आधी अशोक चव्हाणांनीही दावा केला होता की, भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती.

२०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही असंही चव्हाणांनी स्पष्ट केले.

तर अशोक चव्हाणांच्या विधानाला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दुजोरा दिला होता. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत जाहीर सभेत शिंदेंना भाजपच्या जाचाला कंटाळून शिंदेंनी राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनी म्हटलेले खरे आहे. शिंदे हे एकमेव मंत्री होते असं राऊतांनी म्हटलं.

मात्र एकनाथ शिंदे हे स्वत: प्रस्ताव घेऊन जाऊ शकत नाही उद्धव ठाकरेंच्या सांगितले असल्याने ते गेले असतील परंतु याबाबत स्पष्टता नाही. तर खैरे हे उद्धव ठाकरेंचे ज्योतिषी आहेत असं सांगत त्यांचा दावा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी फेटाळून लावला आहे.