Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:25 PM2022-10-07T14:25:16+5:302022-10-07T14:31:47+5:30

shiv sena election symbol Row: अंधेरीची पोटनिवडणूकही लागली आहे. अशावेळी धनुष्यबाण कोणाला मिळणार की फ्रिज होणार यावर अद्याप उत्तर आलेले नाही. दोन्ही गट यासाठी प्रयत्न करत आहेत.

पक्ष कोणाचा हा तर मोठा प्रश्न आहेच, पण धनुष्यबाण कोणाचा यावरून देखील शिवसेनेच्या दोन गटांचे राजकीय भविष्य बऱ्याच अंशी अवलंबून आहे. आज निवडणूक आयोगाकडे दोन्ही बाजुंनी आपापले पुरावे, कागदपत्रे सूपूर्द केली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूकही लागली आहे. अशावेळी धनुष्यबाण कोणाला मिळणार की फ्रिज होणार यावर अद्याप उत्तर आलेले नाही. असे असताना ठाकरे गट धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता किती आहे, यावर पुढच्या साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत.

जर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठविला तर शिंदे आणि ठाकरे गटाने आपले निवडणूक चिन्ह कोणते असावे याची तयारी दसरा मेळाव्यातच केली आहे. दोन्ही गट आपलाच पक्ष आणि निवडणूक चिन्ह असा दावा करत आहेत. यामुळे निवडणूक आयोगासमोर सुनावणी होईपर्यंत हे चिन्ह गोठविले जाण्याची दाट शक्यता आहे.

शिंदे गटाकडूनही धनुष्यबाणाबाबत आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा नसल्यानेच निवडणूक आयोगाने पुरेशी कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस काढूनही वारंवार मुदत वाढवून मागत आहेत. पक्षाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता आयोगाने लवकरात लवकर पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा याचिकाकर्त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

दसरा म्हणजे शस्त्रपूजन, याचवेळी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या मंचावर ५१ फुटांची तलवार आणण्यात आली होती. याचबरोबर धनुष्यबाण आणि गदा देखील आणली गेली होती. या भव्यदिव्य पुजेमुळे राज्यात शिंदे गटाला जर धनुष्यबाण मिळाला नाही तर पुढचे चिन्ह काय असेल याची पेरणी केली गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे शिंदे गट जोवर निकाल लागत नाही तोवर तलवार किंवा गदा हे निवडणूक चिन्ह वापरण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात गदेचा काही वेळा उल्लेख केला. शिवाय शिवसेनेचे धनुष्यबाण आणि वाघाचे चित्र असे दोन्ही असतात. यामुळे धनुष्यबाण गोठविला गेला तर ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाघाचे चिन्ह निवणुकीत वापरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचबरोबर भगवा झेंडा देखील एखादेवेळी पक्षाचे चिन्ह म्हणून शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.