उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:15 AM2022-11-03T09:15:35+5:302022-11-03T09:19:05+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा-शिंदे गट अशी लढाई पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाने अलीकडेच संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक मित्र मिळण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग पुन्हा करू शकतात. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केल्याची माहिती आहे. लवकरच हे दोन्ही नेते एकमेकांना भेटण्याची शक्यता असून त्यातून नवं राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

गेल्या महिन्यात १५ तारखेला प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी प्रस्ताव दिल्याचं सांगितले होते. आता ठाकरे गटाने वंचितच्या दिशेने १ पाऊल पुढे टाकत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून त्यात वंचित-ठाकरे गट युतीशी बोलणी झाल्याची माहिती आहे.

२० किंवा २१ तारखेला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती होऊ शकते असं बोललं जात आहे. स्वत: प्रकाश आंबेडकरांनी याआधीच युतीबाबत भूमिका जाहीर केली होती.

मेधा ठाकूर वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्ही युती करण्याची वेळ आली तर काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गटाशी युती करू अशी भूमिका मांडली होती. आम्ही जाहीर केले आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास युतीवर निश्चित चर्चा होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असून त्यांची वैचारिक भूमिका आहे. त्यांचे आमच्यासोबत वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु राजकारणात कुणाला कुणाचा विचार नसतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे ठाकरे-आंबेडकर यांच्यात चर्चा होत असेल तर त्यात काही वावगं वाटत नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत २ गट पडलेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा नव्याने संघटना बांधणी करावी लागत आहेत. त्यात वंचितसोबत आल्यास फायदा होईल असं ठाकरे गटालाही वाटतं. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात चर्चा होताना दिसतेय.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी १०-१२ मतदारसंघात ५० हजाराहून जास्त मतदान घेतले. त्यामुळे ७ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. आघाडीचे उमेदवार जेवढ्या मताने पराभूत झाले त्याहून अधिक मते वंचितला मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीने ३२ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका दिला. याठिकाणी ५-१० हजारांच्या फरकाने आघाडीचे उमेदवार पडले. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गट एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? आगामी निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रित लढणार का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

याआधी प्रकाश आंबेडकरांनी MIM सोबत युती केली होती. तेव्हा असदुद्दीन औवेसी यांनी महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला होता. मात्र ही आघाडी लोकसभेपुरती मर्यादित राहिली. विधानसभेत ही युती तुटली. त्यामुळे आता शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग राज्यात झाल्यास एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हान उभं राहण्याचीही शक्यता आहे.