मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 'मिशन राष्ट्रवादी'; शरद पवारांना बसणार मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:30 PM2022-09-07T13:30:39+5:302022-09-07T13:33:53+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. शिंदे यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंना शह देत अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सामावून घेतले. इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंनी निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी पदावर नियुक्ती केली.

आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याची सुरुवात नवी मुंबईतून होताना दिसतेय. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे. त्यामुळे नवी मुंबईत अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी, नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं समोर आले आहे.

त्यात प्रामुख्याने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांचा नावाचा समावेश आहे. अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. गावडेंसह राष्ट्रवादीचे नगरसेवकही एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील असं बोलले जात आहे.

खुद्द माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अशोक गावडे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत नामदेव भगत यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो असं म्हटलं. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार म्हणजे तुमच्या मनात काहीतरी ठरलं आहे असं आव्हाडांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. त्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबईत विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुंबईतही शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. तर नवी मुंबईत अशोक गावडे यांच्यासह ५ राष्ट्रवादी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा शहरात सुरू आहे.

नवी मुंबई हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचं बोललं जायचं. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेवर एकहाती सत्ता होती. परंतु गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशानं राष्ट्रवादीची संघटना खिळखिळी झाली. गणेश नाईकांसोबत ५२ नगरसेवक भाजपात सहभागी झाले होते. त्यावेळी अशोक गावडे यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली.

नवी मुंबईत शिवसेनेचे विजय चौगुले हे शिंदे गटात सहभागी झालेत. अशोक गावडे आणि राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांची चौगुले यांनी बैठक घेतल्याचं पुढे आले आहे. त्यामुळे हे ५ नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असं बोलले जात आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांचा धडका पाहता नवी मुंबईत आमचा दबदबा कायम राहील. केवळ राष्ट्रवादी नव्हे तर इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आमच्यात सहभागी होतील असा दावा शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी केला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता आहे.

पुढील काही महिन्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका लागतील. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत याआधीच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रवक्तेपदाची माळ शीतल म्हात्रेंच्या गळ्यात पडली.

शिंदे यांचे वर्चस्व ठाणे जिल्ह्यात जास्त असल्याने याठिकाणच्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत राष्ट्रवादीला फोडून शिंदे स्वत:चा पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात अशोक गावडेसारखे मोठे नेते शिंदे गटात प्रवेश करत असतील तर निश्चितच राष्ट्रवादीला आणि प्रामुख्याने शरद पवारांना हा मोठा धक्का असेल असं विश्लेषक मानतात.