MLA Accident in Maharashtra: महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:20 PM2023-01-11T12:20:06+5:302023-01-11T12:28:56+5:30

विनायक मेटे, सायरस मिस्त्रींच्या अपघातीमृत्यूनंतर अपघातांचे सत्रा थांबेना, २० दिवसांत चार आमदार अपघातात जखमी... सुदैवाने बचावलेत.

गेल्या महिनाभरात राज्याच्या चार आमदारांचे अपघात झाले आहेत. ही आकडेवारी कमी असली तरी धक्कादायक आहे. कारण यापूर्वी एवढ्या झटपट आमदारांचे अपघात झाले नव्हते. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर महिनाभरातच उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला होता. यावेळी राज्यातील रस्ते, पोलीस-वैद्यकीय यंत्रणांवर उहापोह झाला होता.

यानंतर काही महिने होत नाही तोच एकामागोमाग एक अशा चार आमदारांच्या वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे आणि आज बच्चू कडूंचा अपघात आहे. यामुळे रस्ते सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माण तालुक्याचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण शहरानजीक भीषण अपघात झाला होता. फॉर्च्युनर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी ५० फूट नदीत कोसळली. या घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर ४ जण जखमी झाले होते. गोरे यांच्या बरगड्यांना मार बसला होता, तर पायालाही गंभीर दुखापत झाली होती. २४ डिसेंबरला ही घटना घडली होती.

यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. यामध्ये कारच्या पुढील भागाचा चकणाचूर झाला होता. मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. ४ जानेवारीला परळीला जात असताना हा अपघात झाला होता. मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले होते.

यानंतर दोनच दिवसांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला होता. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये ६ जानेवारीला अपघात झाला. खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला टँकरने धडक दिली होती. योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली होती.

आज बच्चू कडू यांच्या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. कडू यांना एका कार्यक्रमाला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने उडविले होते. दुभाजकावर कडू यांचे डोके आदळले, तसेच दुचाकी आदळल्याने पायाला दुखापत झाली आहे. कडू यांच्या डोक्यावर चार टाके पडले आहेत.

विनायक मेटे, मिस्त्री यांच्या अपघातावेळी राजकीय व्यक्ती रस्ते अपघाताबाबत रस्ते सुरक्षा, हॉस्पिटले, वैद्यकीय मदत आदीवर बोलत होते, परंतू या दोघांच्या मृत्यूनंतरही आजही स्थिती जैसे थेच आहे.