डोक्यावर पदर घेत 'ती' सरकारी रुग्णालयात पोहचली; चेहरा पाहून अधिकाऱ्यांना घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:08 PM2024-03-13T12:08:49+5:302024-03-13T12:13:10+5:30

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. डोक्यावर पदर घेवून ही महिला सरकारी रुग्णालयात पोहचली. तिचा चेहरा कुणालाही दिसत नव्हता. मात्र जेव्हा तिने चेहरा दाखवला तेव्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांना घाम फुटला.

यूपीच्या फिरोजाबाद येथील अधिकारी कृती राज चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक सरकारी रुग्णालयाचा दौरा केला. या दौऱ्याबाबत कुणालाच कल्पना नव्हती. हॉस्पिटलमध्ये रुग्ण बनून गेलेल्या कृती राज यांनी तिथल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.

IAS अधिकारी कृती राज यांनी सांगितले की, मला या सार्वजनिक आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या, इथं रुग्णांना आल्यानंतर रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. त्यांच्यासोबत योग्य वर्तवणूक केली जात नाही. सकाळपासून रुग्णांच्या रांगा लागतात परंतु डॉक्टर वेळेवर येत नाहीत यासारख्या अनेक समस्या होत्या.

या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी स्वत: कृती राज या चेहरा लपवून सामान्य रुग्णासारख्या हॉस्पिटलला गेल्या. तिथे रांगेत उभं राहून पावती घेतली, त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्या. तिथे त्यांच्यासोबतही योग्य वर्तवणूक झाली नाही. त्याशिवाय रजिस्टर तपासले असता अनेक कर्मचारी गायब असल्याचे दिसले. अनेकांनी सही केली परंतु प्रत्यक्षात उपस्थित नसल्याचेही आढळले.

त्यानंतर अधिकारी कृती राज यांनी औषधांचा साठा पाहिला तर त्याठिकाणी अनेक औषधे ज्यांची मुदत संपलीय तेदेखील असल्याचे निर्दशनास आले. स्वच्छता नाही. शौचालय, बेडशीट अस्वच्छ होते. रुग्णांना योग्यप्रकारे वागणूक दिली जात नव्हती हे सर्व पाहिल्यानंतर कृती राज यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कोण आहे कृती राज? IAS अधिकारी कृती राज या झाशी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचं सुरुवातीचे शिक्षण झाशीतून झाले. २००० मध्ये यूपीएससी परीक्षेत त्यांना १०६ वा रँक मिळवला असून कृती राज या त्यांच्या अनोख्या कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात.

कृती राज यांची काम करण्याची वेगळी पद्धत आहे. सोशल मीडियावर कृती राज यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॅशनेबल फोटोंना हजारोंनी लाईक्स मिळतात. सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृती राज चर्चेत आल्या आहेत.

कृती राज यांनी कॅम्प्युटर सायन्समधून बीटेक केले आहे. इतकेच नाही तर पहिल्याच प्रयत्नात कृती राज यांनी UPSC परीक्षेत चांगले यश मिळवून IAS अधिकारी बनल्या.