Success Story: कधीकाळी मशीन वर्कर म्हणून केले काम, आज एका पोस्टसाठी घेतो 6 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:43 PM2022-09-18T17:43:09+5:302022-09-18T17:50:33+5:30

Success Story: 22 वर्षीय खाबे लेम सोशल मीडिया स्टार असून, तो एका पोस्टसाठी कोट्यवधी रुपये आकारतो.

Success Story: तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल, तर तुम्हाला खाबे लेमची (Khaby Lame) ओळख सांगण्याची गरज नाही. तुमच्यापैकी काहीजण त्याला नावाने ओळखत नसतील, पण कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाबे लेमचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. कोरोना काळात टिकटॉकवरुन सुरुवात करणारा 22 वर्षीय खाबे आज एक सोशल मीडिया सेंसेशन आहे.

एका पोस्टसाठी 6 कोटी- काही दिवसांपूर्वीच खाबेने आपल्या ब्रँड एंडोर्समेंट पोस्टची कमाई सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. खाबे सोशल मीडिया पोस्टद्वारे एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कैक पटीने जास्त कमाई करतो. खाबेने सांगितल्यानुसार, त्याला एंडोर्समेंट पोस्टसाठी $750,000(सूमारे 6 कोटी रुपये) मिळतात.

खाबेने 2022 मध्ये आतापर्यंत 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. खाबे जूनमध्ये टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स(14.95 कोटी) असणारा व्यक्ती बनला आहे. शुल्लक गोष्टींचे व्हिडिओ बनवतो- कोरोना काळात खाबे सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या दैनंदिन जीवनातल्या अगद्दी शुल्लक गोष्टी(लाईफ हॅक्स) करुन दाखवतो.

विशेष म्हणजे, त्याच्या आतापर्यंतच्या एकाही व्हिडिओमध्ये तो एकही शब्द बोलत नाही. फक्त हातवारे आणि चेहऱ्यावरील मजेशीर भाव दाखवून तो व्हिडिओ बनवतो. त्याची ही आगळी-वेगळी स्टाईल सर्वांना आकर्षित करते. या मजेशीर व्हिडिओंनी खाबेला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आणि तो टिकटॉकवर सर्वाधिक फॉलो केली जाणारा व्यक्ती बनला.

भारतीय स्टार्सच्या तुलनेत किती कमाई? भारतीय फलंदाज विराट कोहली एका पोस्टसाठी 5.3 कोटी रुपये घेतो. तर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका पोस्टसाठी 3.2 कोटी रुपयांपर्यंत घेते. तर, शाहरुख एका पोस्टसाठी 80 लाख ते 1 कोटी रुपये घेतो. आलिया भट्टदेखील एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये घेते. या सर्वांच्या कमाईचा विचार केला, तर खाबे यांच्यापेक्षा खूप जास्त पैसे कमवतो.

खाबे लेम 2001 मध्ये सेनेगलहून आपल्या पालकांसह ट्यूरिन, इटली येथे स्थलांतरीत झाला होता. खाबेला 3 भावंडे आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मशीन वर्कर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. परंतु कोविड-19 मुळे कंपनी बंद झाली आणि खाबे बेरोजगार झाला. यानंतर खाबेने टिक टॉकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि बघता बघता खाबे प्रसिद्ध झाला. एकेकाळी अतिशय गरीब असणारा खाबे आज कोट्यवधी रुपयांमध्ये खेळत आहे.