लाल किल्ला फक्त दिल्लीतच नाही तर पाकिस्तानमध्येही आहे, बांधण्यासाठी लागली होती 87 वर्षे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 08:47 PM2020-03-06T20:47:16+5:302020-03-06T21:01:12+5:30

दिल्लीत लाल किल्ला हा भारताच्या ऐतिहासिक वारसांपैकी एक मानला जातो. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता.

2007 साली या ऐतिहासिक किल्ल्याची निवड युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून केली होती. पण, तुम्हाला माहिती आहे का? दिल्ली व्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये लाल किल्ला आहे, जो बांधण्यासाठी 87 वर्षांचा कालावधी लागला होता.

पाकिस्तानमधील हा लाल किल्ला इस्लामाबादपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या मुझफ्फराबाद येथे आहे. याला मुझफ्फराबाद किल्ला किंवा रुट्टा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.

दरम्यान, चक राज्यकर्त्यांनी मुघलांपासून वाचण्यासाठी हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली.

या किल्ल्याचे बांधकाम १५५९ ला सुरू झाले. मात्र, मुघलांनी 1587 मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम कासवाच्या वेगाने सुरू झाले.

अखेरीस, किल्ल्याचे बांधकाम 1646 मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी बोम्बा जमातीच्या 'सुलतान मुझफ्फर खान' याने याठिकाणी राज्य केले होते. त्याने याठिकाणी मुझफ्फराबाद वसवले.

1846 मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावेळी डोगरा घराण्याचे महाराजा गुलाबसिंग येथे राज्य करीत होते.

डोगरा घराण्याच्या सैन्याने सन 1926 पर्यंत हा किल्ला वापरला. त्यानंतर ते सोडून गेले. त्यामुळे हा किल्ला ओसाड पडला होता.

हा किल्ला तिन्ही बाजूने नीलम नदीने व्यापलेला आहे. पाकिस्तानने या किल्ल्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले, त्यामुळे किल्ला ओसाड पडला. आता हा किल्ला उद्धवस्त झाल्यासारखा दिसत आहे.