रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार? संपूर्ण जगाची चिंता वाढली, नेमकं काय करतंय अमेरिका पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 09:24 AM2022-04-14T09:24:05+5:302022-04-14T09:28:18+5:30

बुका शहरातील नरसंहारामुळे या युद्धाला वेगळे वळण लागले आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेने या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू होऊन आता दीड महिना झाला. बुका शहरातील नरसंहारामुळे या युद्धाला वेगळे वळण लागले आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेने या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच युक्रेनच्या बाजूने नाटोने युद्धात उतरावे यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे.

३० हून अधिक पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला लष्करी साह्य केले आहे. त्यात रणगाडाविरोधी संरक्षण प्रणालीचाही समावेश आहे. युरोपीय समुदायाने आठ हजार कोटी तर अमेरिकेने १३ हजार कोटींची मदत केली आहे.

स्ट्रिंगर क्षेपणास्त्रेही युक्रेनला देण्यात आली आहेत. ब्रिटनने स्टारस्ट्रिक पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम दिली आहे. झेक प्रजासत्ताकाने टी-७२ रणगाडे तर स्लोव्हाकियाने एस-३०० एअर डिफेन्स प्रणाली ही मदत युक्रेनला केली आहे.

युक्रेनला आतापर्यंत अमेरिकेसह युरोपीय देशांनी अनेक प्रकारे मदत केली आहे. युरोप-अमेरिकेने केलेल्या या मदतीवर रशियाने आक्षेपही घेतले आहेत.

बुका शहरात रशियन सैन्याने केलेल्या क्रूर कृत्यांच्या विरोधात जगात असंतोष आहे. रशियाच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी अमेरिका युक्रेनच्या साह्यासाठी नाटोच्या माध्यमातून या युद्धात उतरू शकते.

युक्रेनने जर ओडेसानजीकच्या काळ्या समुद्रात डेरेदाखल असलेल्या रशियन सैन्यावर अँटिशीप मिसाइलने हल्ला केला तर रशियावर दबाव निर्माण होईल आणि ज्यांनी युक्रेनला आधुनिक शस्त्रास्त्रे दिली आहेत त्या देशांवर रशिया हल्ला चढवेल.

त्यानिमित्ताने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सबळ कारण मिळेल. पोलंडमार्गे रशियावर हल्ला झाल्यास नाटोवर सगळे खापर फोडून रशिया हल्ल्यांची तीव्रता वाढवेल. नाटोही प्रत्युत्तरासाठी सरसावेल.