कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 07:52 PM2020-06-06T19:52:48+5:302020-06-06T20:12:02+5:30

कोरोनाचं जगभरात फैलाव झाला असून, अनेक देशांना या विषाणूवर नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. बरेच देश कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत

. तर काही देशांनी कोरोनावर औषध तयार केल्याचा दावाही केला आहे. पण कोरोना एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरतोय कसा हे सगळ्यांसाठी कोडं आहे.

विशेष म्हणजे आता अभ्यासातून नवाच खुलासा करण्यात आला आहे. रक्तगट ए असलेल्या लोकांना कोरोना विषाणूची तीव्र धोका असल्याचं आता समोर आलं आहे.

सर्वात आधी चीनच्या वैद्यकीय वैज्ञानिकांनी कोरोनामधील गंभीर रूग्णांमध्ये ए रक्तगट असलेल्या लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याची माहिती दिली होती. त्याला आता जर्मनीमधील संशोधकांनीही दुजोरा दिला आहे.

जर्मनीच्या कील विद्यापीठाच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की, विशिष्ट प्रकारच्या जीन्स यासाठी जबाबदार असू शकतात.

संशोधनादरम्यान असे आढळले की, रक्तगट ए असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता 50 टक्के जास्त आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार बहुधा निरोगी व तंदुरुस्त तरुणही कोरोना विषाणूमुळे संक्रमित होऊन गंभीर आजारी पडण्याची शक्यता आहे. अमेरिका, स्पेनसह बर्‍याच देशांमध्ये निरोगी आणि तंदुरुस्त तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

किल विद्यापीठाच्या संशोधकांनी ए रक्तगट असलेल्या लोकांना असलेला धोका तपासण्यासाठी स्पेनमधील 1610 रुग्णांवर अभ्यास केला आणि ए रक्तगट असलेल्या लोकांना जास्त धोका असल्याचं समोर आलं.

अभ्यासानुसार रुग्णांच्या रक्तगटाचे विशिष्ट नमुने घेऊन कोणाला जास्त धोका आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला.

या अभ्यासातून दोन निष्कर्ष समोर आले आहेत. रक्तगट A असलेल्या लोकांना अधिक धोका असल्याचं समोर आलं, तर O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना तुलनेनं आजारी पडण्याचा धोका कमी असल्याचं उघड झालं.