शिंजो अबेंच्या प्रयत्नांमुळे चार देशांची होत होती एकजूट; चीनला आलं होतं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:21 AM2022-07-09T09:21:16+5:302022-07-09T09:31:31+5:30

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची काल एका हल्लेखोरानं गोळ्या झाडून हत्या केली. शिंजो अबे भाषण करत असतानाच हल्लेखोरानं मागून येऊन त्यांना आवाज दिला आणि त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानं असं का केलं याचं कारण जरी समोर आलेलं नसलं तरी शिंजो अबेंच्या हत्येमागचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे.

जपानसोबतच क्वाडची (QUAD) निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये समावेश असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या नेतृत्त्वांना शिंजो अबे यांच्या हत्येनं मोठा धक्का बसला आहे. क्वाड देशांना एकत्र आणण्यात शिंजो अबे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती असंही नेत्यांनी म्हटलं आहे.

शिंजो अबे यांनी शांतीपूर्ण समृद्धी जग यासाठी अथक प्रयत्न केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येच्या घटनेनं स्तब्ध झालो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अबे यांची हत्या क्वाड देशांसाठी मोठा धक्का ठरला आहे यात तिळमात्र शंका नाही.

क्वाडच्या स्थापनेत शिंजो अबे यांचा सिंहाचा वाटा होता. हाच मुद्दा चीनला देखील त्यावेळी खूप झोंबला होता. २००७ साली जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी हिंद-पॅसिफीक समुद्री क्षेत्रातील सामर्थ्यशाली देश सामील होऊ शकतील अशी एक संघटना तयार करावी असा प्रस्ताव दिला होता.

२००७ साली क्वाड (QUAD) ची स्थापना झाली आणि पुढील १० वर्ष म्हणजेच २०१७ पर्यंत यात काही फारसं घडलं नाही. पण २०१७ साली जेव्हा पुन्हा क्वाडला नवा हुरुप मिळाला. कारण चीनचा वाढता प्रभाव रोखणं या उद्देशाखाली क्वाडमधील चारही देश आता एकत्र येऊ लागले होते.

२०१९ मध्येही QUAD देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती. पण कोरोनामुळे २०२० मध्ये क्वाडची बैठक होऊ शकली नव्हती. नोव्हेंबर २०२१ मध्ये क्वाडमध्ये सामील असलेल्या चारही देशांनी अरबी समुद्रात शक्तिप्रदर्शन केलं होतं.

क्वाड देश असे सक्रीय झाल्यानं आणि समुद्रात युद्धाभ्यास सुरू केल्यानं चीनची चिंता वाढली होती. यामागे अमेरिकेच कटकारस्थान असल्याची शंका चीनकडून वारंवार उपस्थित करण्यात आली. चीनच्या वाढत्या प्रगतीला रोखण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप चीननं केला.

क्वाड म्हणजेच क्वाड्रीलेटरल सिक्युरिटी डायलॉग (QUAD). जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका या चार देशांमध्ये एक बहुराष्ट्रीय करार करण्यात आला आहे. या माध्यमातून चारही देश हिंद-पॅसिफीक महासागरात काम करतात. ज्यामुळे समुद्री मार्गातील व्यापार अधिक सुकर होऊ शकेल. त्यासोबतच सैनिक तळ आणखी मजबूत करण्याकडेही अधिक लक्ष दिलं जाऊ शकेल. जेणेकरुन देशांच्या लष्करी सामर्थ्याचं संतुलन राखता येईल.

क्वाड देशांमध्ये चीनचा समावेश नाही. त्यात जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत यासारखे देश एकत्र आल्यामुले चीनच्या भुवया उंचावल्या होत्या. क्वाडच्या स्थापनेत शिंजो अबे यांचा मोलाचा वाटा असल्यानं चीनचं अबे यांच्याबाबतीत चांगलं मत नव्हतं.

शिंजो अबे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलेले नेते आहेत. आजारपणामुळे त्यांनी पंतप्रधानपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला होता. ६७ वर्षीय शिंजो अबे यांच्यावर शुक्रवारी जपानच्या पश्चिम भागात असलेल्या नारा शहरात ते भाषण करत असताना एकानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.