Shinzo Abe Assassination: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या झाडून हत्या, चीनमध्ये जल्लोष; शिंजो अबेंवर का चिडायचा चीन..?

By ओमकार संकपाळ | Published: July 8, 2022 06:37 PM2022-07-08T18:37:26+5:302022-07-08T18:42:21+5:30

Shinzo Abe Assassination: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची आज सकाळी एका सभेदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Shinzo Abe Assassination: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हत्येमुळे जगभरात शोककळा पसरली आहे. भारतासह अनेक देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी अबे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

मात्र चीनमधील काही लोक अबेंच्या हत्येने खूप आनंदी झाले असून, मोठा आनंदोत्सव साजरा करत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अबे यांच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचे हिरो असे वर्णन केले जात आहे. शिंजो अबे यांच्याशी चीनचे वैर खूप जुने आहे, कारण अबे नेहमीच चीनच्या चुकीच्या धोरणांवर टीका करायचे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिंजो अबे यांना जपानच्या पश्चिम भागात एका सभेदरम्यान गोळ्या घातल्याचे वृत्त प्रसार माध्यमात येताच चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तसेच काही युझर त्यांच्या मृत्यूच्या शुभेच्छा देत होते. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या चीनच्या एका व्यंगचित्रकाराने युजर्सच्या काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

शिंजो अबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चीनचे नागरिक कसे आनंदी आहेत आणि त्यांच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत आहेत हे या ट्विटवरून दिसून येते. यातील एका युजर्सने लिहिले की, जपानच्या सध्याच्या पंतप्रधानांना तसेच कोरियन लोकांनाही गोळी मारायला हवी होती. तर, दुसर्‍या युजरने हल्लेखोराचे हिरो म्हणून वर्णन करताना लिहिले, 'थँक्यू अँटी जपान हिरो, मी आनंदी झालो.'

चिनी तज्ज्ञांच्या मते, अबे यांच्यावरील हल्ल्यामुळे जपानमधील उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये मोठा रोष निर्माण होईल आणि ते सक्रिय होऊन युद्ध सुरू करू शकतात. तसेच, जपानमध्ये आर्थिक संकट येऊ शकते आणि सामाजिक मतभेद देखील उद्भवू शकतात. ग्लोबल टाइम्सने तज्ज्ञाच्या हवाल्याने म्हटले की, या हल्ल्यामुळे जपानचे शांततापूर्ण संविधान बदलू शकते, ज्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम होईल आणि चीन आणि अमेरिकेसारखे संबंध विकसित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

चीनला अबेंचा राग का होता? माजी पंतप्रधान शिंजो अबे हे चीनच्या विस्तारवादी धोरणांचे मोठे टीकाकार आहेत. कोरोनाच्या उत्पत्तीसाठी त्यांनी उघडपणे चीनला जबाबदार धरले होते. याशिवाय त्यांनी तैवानमधील चीनच्या कारवायांविरोधात नेहमीच आवाज उठवला आणि आपल्या शेजाऱ्यांना शस्त्रांची धमकी देण्याचे धोरण चुकीचे म्हटले. इतकंच नाही तर 2007 मध्ये क्वाड सुरू करून त्यांनी भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह चीनविरुद्ध एक मजबूत मंच तयार केला होता.