India vs Pakistan Terrorism: 'दहशतवादाचा एक्स्पर्ट' म्हटल्यावर पाकिस्तानला झोंबली मिर्ची, भारतावर केले बेधुंद आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:59 PM2022-10-03T17:59:12+5:302022-10-03T18:03:35+5:30

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या टीकेमुळे पाकिस्तानचा तीळपापड

India vs Pakistan Terrorism: भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणाव गेल्या काही महिन्यात कमी होताना दिसत असला तरी आता तो पुन्हा एकदा वाढला आहे. सोमवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुजरातमध्ये बोलताना पाकिस्तानवर शेलक्या शब्दांत टीका केली. काही दिवसांपूर्वीच, अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या संमतीने पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत केली, त्यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले होते.

अमेरिकेचा समाचार घेतल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर उघडपणे टीका केली. जयशंकर म्हणाले, "एकीकडे जग भारताला IT मधील एक्सपर्ट मानते, तर पाकिस्तान म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयातील तज्ज्ञ (Expert) आहे. पाकिस्तानशिवाय दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देणारा जगात दुसरा कोणताही देश नाही. पाकिस्तानी दर वेळी भारताविरोधात कशाप्रकारे कटकारस्थान करत असतो ते साऱ्या जगाने पाहिले आहे."

"पाकिस्तानने आता समजून जायला हवे की अशा प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. पाकिस्तान असो किंवा दुसरा कोणताही देश असो, जर असं काही करत असेल तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील", असेही जयशंकर म्हणाले. जयशंकर यांच्या विधानाने पाकिस्तानला चांगलीच मिर्ची झोंबली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर स्पष्टीकरण देत भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जयशंकर यांच्या वक्तव्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी पुन्हा संतापाच्या भरात भारताबद्दल खोटे दावे करून जगाची दिशाभूल करण्याचे काम केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक विधान जारी करण्यात आले. त्यात एस जयशंकर यांच्या विधानाला उत्तर देण्याचा तसेच, दहशतवादाच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला.

"जयशंकर यांनी केलेली पाकिस्तानची निंदानालस्ती पाहता हे स्पष्ट होते की भारत कायमच जगासमोर दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची प्रतिमा मलिन करतो. जयशंकर यांनी केलेली विधाने पूर्णपणे गैरजबाबदारपणाची आहेत. आम्ही याचा निषेध करतो", असे याबाबत सांगण्यात आले.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणखी एक अजब दावा केला. त्यांनी आपल्या पत्रकात असे म्हटले, "आमच्यावर आरोप करणारे भारत सरकार खरे पाहता स्वत:च आपल्या भूमीवर दहशतवादाला समर्थन देतात, त्यांना मदत करतात. आणि पाकिस्तानच्या विरोधात देखील भारतीय भूमीवर कटकारस्थाने रचली जातात."