पाकिस्तानच्या 'या' ३ महिला तुरूंगातून लढणार निवडणूक; नवाझ शरीफच्या कुटुंबीयांशी देणार झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 04:16 PM2024-01-28T16:16:24+5:302024-01-28T16:41:36+5:30

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला होणार आहे निवडणुका

Pakistna Elections, Female Candidates from Jail: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. काही प्रस्थापित तर काही नव्या दमाचे उमेदवार मोठ्या संख्येने आपले नशीब आजमावत आहेत. सुप्रीम कोर्टाने इम्रान खान यांच्या पीटीआयचे क्रिकेट 'बॅट' हे निवडणूक चिन्ह काढून घेतले असल्याने पीटीआयच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत तुरुंगातून निवडणूक लढवणारेही काही उमेदवार आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या तीन महिला तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत. या तिघीही शरीफ कुटुंबाविरोधात निवडणूक लढवणार आहेत. जाणून घेऊया त्या तिघींबद्दल...

आलिया या पंजाबमधील महिलांसाठी आरक्षित जागेवर PTI उमेदवार म्हणून पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये निवडून आल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची फेडरल संसदीय सचिव म्हणून नियुक्तीही केली होती. नॅशनल असेंब्ली-118 मधून त्या लढणार आहे. तेथे पीएमएल-एन नेते हमजा शेहबाज शरीफ हे सर्वात मजबूत उमेदवार मानले जातात. मात्र यावेळी पीटीआयच्या आलिया हमजा मलिक यांच्याकडून त्यांना कडवी टक्कर अपेक्षित आहे. २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा हमजा शेहबाज शरीफ यांच्या पीएमएल-एनने जिंकली होती.

तुरुंगात असलेल्या PTI महिला कार्यकर्त्या सनम जावेद नॅशनल असेंब्ली-119 मधून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या प्रमुख मरियम नवाज यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. सनम जावेद आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या अनेक महिला कार्यकर्त्या ९ मेच्या हिंसाचार घटनांमुळे गेल्या पाच महिन्यांपासून वेगवेगळ्या तुरुंगात बंद आहेत.

इम्रान यांच्या पक्षाच्या नेत्या डॉ. यास्मिन रशीद यांनी नवाझ शरीफ यांच्याविरोधात लाहोर नॅशनल असेंबली-130 मतदारसंघातून निवडणूक लढवायचे ठरवले आहे. दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. 1990 पासून हा मतदारसंघ पीएमएल-एनचा बालेकिल्ला आहे, जेव्हा नवाझ शरीफ यांनी पहिल्यांदाच ती जागा जिंकली होती. शरीफ यांनी 1993, 1997 आणि 2013 मध्ये जागा राखली, तर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी 2002 आणि 2008 मध्ये जागा जिंकली. 2013 ते 2023 या काळात डॉ. यास्मिन रशीद या जागेवरून तीनदा दावेदार होत्या, प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.