ही कसली मैत्री? अमेरिकेकडून Visa साठी भारतीयांना ८३३ दिवस वेटिंग, तर चीनला २ दिवसांत अपॉइंटमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 02:49 PM2022-09-29T14:49:12+5:302022-09-29T15:14:11+5:30

भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांना व्हिसासाठी २ वर्षांपर्यंत दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. भारतीय लोकांचा संताप आणि तक्रारींदरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याकडे भारताकडून प्रलंबित यूएस व्हिसा अर्जांचा मुद्दा उपस्थित केला.

अमेरिकेने कोरोना महामारी हे यामागचे मुख्य कारण सांगितलं आहे, पण त्यांची वेबसाइट चीनसाठी व्हिसा अर्ज अवघ्या २ दिवसांत निकाली काढत आहे. तर दिल्लीहून आलेल्या अर्जाला ८४८ दिवस लागतात.

यूएस स्टेट डिपार्टमेंट वेबसाइट दाखवते की दिल्लीहून व्हिसा अर्जांसाठी ८३३ दिवस आणि मुंबईतून अर्ज करण्यात आलेल्यांना ८४८ दिवसांची अपॉइंटमेंटसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याउलट, चीनची राजधानी बीजिंगची वेटिंग कालावधी केवळ २ दिवसांचा आहे. तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथून अर्जांसाठी वेटिंगचा काळ ४५० दिवस आहे.

स्टूडंट व्हिसासाठी दिल्ली आणि मुंबईसाठी वेटिंग काळ ४३० दिवसांचा आहे. राजधानीतील व्हिजिटर व्हिसासाठी ८३३ दिवस आणि इतर व्हिसासाठी वेटिंग पीरियड ३९० दिवसांचा आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील व्हिजिटर व्हिसासाठी ८४८ दिवस तर इतर व्हिसासाठी ३९२ दिवस वाट पाहावी लागते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थी व्हिसासाठी इस्लामाबादला केवळ एक दिवस, तर बीजिंगसाठी दोन दिवसांचा वेटिंग पीरियड आहे. व्हिजिटर व्हिसासाठी इस्लामाबादहून अर्ज करण्याचा वेटिंड पीरियड तब्बल ४५० दिवस आहे. मग तो बीजिंगचा व्हिजिटर व्हिसा असो किंवा स्टुडंट व्हिसा, दोन्हीसाठी प्रतीक्षा वेळ फक्त २ दिवस इतका आहे.

भारतीय लोकांच्या व्हिसाच्या मुद्द्यावरुन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी काल भारताचा व्हिसा अर्जांचा बॅकलॉगचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर, अमेरिकेच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिका या प्रकरणांबद्दल संवेदनशील आहे आणि ते सोडवण्याची त्यांची योजना आहे. अँटनी ब्लिंकन यांनी भारतीय नागरिकांसाठी व्हिसा अर्ज प्रलंबित राहण्यासाठी कोविड-19 महामारीला जबाबदार धरलं आहे.

अमेरिकेने मार्च 2020 मध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे जगभरातील जवळजवळ सर्व व्हिसा अर्जांवर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया थांबवल्यानंतर, यूएस व्हिसा सेवा आता प्रलंबित अर्ज सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांची येथे सुमारे तासभर भेट झाली. प्रतिभेचा विकास आणि हालचाली सुलभ करणे हे देखील आमच्या परस्पर हिताचे आहे, असे जयशंकर यांनी बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या फॉगी बॉटम मुख्यालयात ब्लिंकेन यांच्याशी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. यातील अडथळे दूर केले जावेत यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

भारतातील अनेक इंटरनेट युझर्सनं बुधवारी ट्विटरवर भारतीयांनी यूएस व्हिसासाठी केलेल्या अर्जांवर निर्णय घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. या विलंबामुळे भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या हिताचं नुकसान होत असल्याचं काही युझर्शनं सांगितलं. त्यांनी ट्विटरवर असे मीडिया रिपोर्ट शेअर केले, ज्यात काही प्रकरणांमध्ये व्हिसाच्या प्रतीक्षा कालावधीचा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा उल्लेख आहे.

एका युझरनं ट्विट केलं की, “भारतातील मोठ्या संख्येनं कोट्यधीश, तंत्रज्ञान व्यावसायिक, डॉक्टर आणि विद्यार्थी अमेरिकेत जाण्यास उत्सुक आहेत. पण व्हिसाचा प्रतीक्षा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त आहे". या यूझरनं यूएस व्हिसासाठी मुलाखत घेण्यास सुरुवात केली असता प्रतीक्षा कालावधी 800 दिवस दाखवत असल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. त्याचप्रमाणे, दुसर्‍या वापरकर्त्याने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टॅग करत "सर, भारत-अमेरिकेचा व्हिसा मुद्दा खरोखरच अनेक विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या हिताला धक्का देत आहे. कृपया, त्यांचा आवाज उठवण्यासाठी मदत करा", अशी मागणी केली आहे.