मुंबईसारखेच दाटीवाटीचे शहर! समुद्रात बुडणार या देशाची प्रसिद्ध राजधानी; राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:25 PM2023-03-10T15:25:41+5:302023-03-10T15:45:30+5:30

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिंका, हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे मुंबईसह समुद्रालगतची अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिंका, हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे मुंबईसह समुद्रालगतची अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता देखील समुद्राच्या पाण्याखाली जाणार आहे. यामुळे तेथील राज्यकर्त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

इंडोनेशियाचे राष्ट्रपतींनी जकार्ताला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे जकार्ता ही राजधानी राहणार नसून बोर्निया द्वीपावर नवीन राजधानी उभारण्यात येत आहे. कालीमंतन प्रांतामध्ये यासाठी 256,000 हेक्टरवर नवीन शहर वसविले जात आहे. याचे बांधकामही सुरु झाले आहे.

ही राजधानी म्हणजे एक टिकाऊ जंगलाचे शहर असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये पर्यावरणाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. नवीन राजधानी २०४५ पर्यंत कार्बन-न्यूट्रल बनविण्यात येणार आहे. जिते ही राजधानी वसविली जातेय तिथे जंगल आहे, अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि आदिवासी राहत आहेत.

अशा जागेवर राजधानी वसविण्याच्या प्रस्तावावरून वाद सुरु झाला आहे. जंगली प्राण्यांचा अधिवास जाईलच परंतू आदिवासींचेही स्थलांतर होणार आहे. जकार्तामध्ये जवळपास १ कोटी लोक राहतात. हे शहर जगातील सर्वात वेगाने बुडणारे शहर म्हटले गेले आहे. 2050 पर्यंत या शहरातील एक तृतीयांश भाग पाण्याखाली जाणार आहे.

जकार्ताची हवा आणि पाणी अत्यंत प्रदूषित आहे आणि पूर नेहमीच येत असतो. जकार्तामध्ये इतकी गर्दी आहे की रस्त्यावर चालणे कठीण होत आहे. एकंदरीत मुंबईसारखीच परिस्थिती तिथे आहे. या गर्दीमुळे इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेला वर्षाला $4.5 बिलियनचे नुकसान सोसावे लागते.

जकार्ताच्या या समस्या पाहून राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी देशाची नवी राजधानी बनवण्याची कल्पना तयार केली होती. आता ती प्रत्यक्षात येत आहे. आता या नव्या राजधानीमध्ये सामान्यांना राहण्यास जागा असेल की फक्त सरकारी कर्मचारी असतील याबाबत माहिती समोर आलेली नाहीय.

विडोडो हे बोर्नियो बेटावर नुसांतारा शहराची उभारणी करणार आहेत. नुसंतारा हा जुना इंडोनेशियन शब्द आहे ज्याचा अर्थ द्वीपसमूह आहे. या नव्या राजधानीत सरकारला सर्व काही नव्याने उभारावे लागणार आहे. सरकारी इमारती, घरांची पुनर्बांधणी केली जाणार आहे.

पुढील वर्षी 17 ऑगस्ट रोजी इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या शहराची बांधणीला सुरुवात होणे अपेक्षित आहे. 2045 मध्ये इंडोनेशिया आपला शंभरावा वर्धापन दिन साजरा करेल. 2045 पर्यंत राजधानी पूर्णपणे बांधली जाईल असे सांगण्यात येत आहे.