Health Tips: प्रवासात गाडी 'लागण्याची' भीती वाटते? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:58 PM2024-01-18T12:58:49+5:302024-01-18T13:02:35+5:30

Health Tips: तुमचा छंद कोणता असे विचारले असता, अनेकांकडून उत्तर येते, ते म्हणजे भटकंती! पण ती केवळ पायी शक्य नाही. वेगवेगळी ठिकाणं पाहायची, म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा, विमान, जहाज असे विविध पर्याय निवडावेत लागतात. काही जणांना गाडीत त्रास होत नाही, पण बसच्या नुसत्या नावानेही मळमळतं! तर काही जणांना बस आरामदायी वाटते तर कारने जाताना त्रास होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती! अशाच प्रवास 'लागणाऱ्यांसाठी' अर्थात प्रवास ज्यांना उलटी होण्याची भीती वाटते. त्यांनी पुढील उपाय अवश्य करा.

प्रवासात आरोग्य नीट नसेल तर कुठेही लक्ष लागत नाही. उपाशी पोटी प्रवासही करवत नाही. अशा वेळी मध्य कसा काढायचा, कोणती पथ्य पाळायची आणि कोणत्या चुका टाळायचा, कोणते पदार्थ वर्ज्य करायचे ते जाणून घ्या.

आपण बऱ्याचदा लांबच्या प्रवासाला जातो, तेव्हा आपण बाहेरचं खाणं खातो. कधी गाड्यांमधील, कधी कॅन्टीनमधून, कधी छोट्या दुकानातून, तर कधी ढाब्यांवर. ते अन्न स्वच्छ असेल याची शाश्वती नसते. पण तेव्हा आपण पोटाचा विचार न करता फक्त चवीचा विचार करून जिभेचे चोचले पुरवतो. आणि नंतर होणाऱ्या त्रासामुळे पश्चात्ताप करतो.

अशातच जर तुम्ही गाडी किंवा बसमधून प्रवास केला तर तुम्हाला उलटी होईल की काय असे वाटू लागते. उलटी होण्याआधी बऱ्याचदा लोकांना मळमळ आणि आम्लपित्तासारखे वाटते. परंतु पुढे दिलेले उपाय केले असता तुम्हाला उलटी, मळमळ याची उबळही येणार नाही याची खात्री बाळगा.

आलं खाल्ल्याने उलटी बंद होण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही आलं पाण्यात हलके गरम करूनही पिऊ शकता. काही जण आल्याचा चहा पितात, पण त्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते. म्हणून आल्याचा छोटासा तुकडा जवळ ठेवावा आणि त्रास होईल असे वाटत असल्यास किंवा प्रवासाला निघताना हळू हळू चघळत राहावा.

बऱ्याच लोकांना लिंबू चोखल्याने उलट्या थांबण्यास मदत होते. पण लिंबाची तुरट चव थेट जिभेला लावणं आवडत नसेल तर लिंबू सरबत कॅरी करून अध्ये मध्ये घोट घोट लिंबू पाणी देखील पिऊ शकता.

प्रवासाला निघण्याच्या तासभर आधी एक कप गरम पाण्यात एक चमचा लवंग पूड उकळून गाळून प्या. त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांपासून आराम मिळतो. किंवा प्रवासात निघाल्यावर एखादी लवंग तोंडात ठेवा. त्याचा अर्क जिभेवर आल्याने उलटीची उबळ येत नाही.

उलटीची उबळ आलीच तर त्याक्षणी मोठा श्वास घ्या आणि काही चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान मळमळ होत असल्यास ही पद्धत खूप प्रभावी आहे. उबळ येण्याचा तो क्षण सावरता आला की त्यानंतर परत त्रास होत नाही.

संत्र्याचा रस प्यायल्याने किंवा संत्र्याच्या फोडी खाल्ल्याने उलट्या थांबतात. प्रवासात अरबट चरबट खाण्यापेक्षा संत्री खाल्याने तजेला टिकून राहतो आणि पाण्याची तहानही भागते.

एक चमचा बडीशेप एक कप पाण्यात 10 मिनिटे उकळून प्यायल्यानेही उलट्या थांबतात. तसेच प्रवासात छोट्याशा पुडीत बडीशोप घेऊन अध्ये मध्ये ती चघळत राहिल्यानेही उलटीचा त्रास होत नाही. आवळा सुपारी देखील त्याला उत्तम पर्याय ठरू शकते.

उलटी झाल्यावर शरीरातील ताकद गेल्यासारखे वाटते. अशा वेळी इन्स्टंट एनर्जीसाठी चिमूटभर मीठ आणि एक चमचा साखरेचे पाणी घोळून प्यायल्याने आराम मिळेल.