ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको! उशिरा उपचार केल्यास आजार बळावेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:46 AM2023-11-15T11:46:06+5:302023-11-15T11:57:23+5:30

स्तनाच्या कर्करोगाचे सर्वांत मोठे लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ परंतु हे कर्करोगाचे एकमेव लक्षण नाही.

मुंबई : आजकाल जगभरातील अनेक महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाची समस्या वाढताना दिसत आहे. या आजाराची सर्वांत गंभीर बाब म्हणजे फार सुरुवातीला याची लक्षणेच लक्षात येत नाहीत. फार नंतर उपचार सुरु केल्यास आजार पूर्ण बरा होण्यात बरेच अडथळे येतात.

मात्र, तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शरीरात आढळून आल्यावर कर्करोगाची तपासणी करून घेणे हिताचे ठरेल. स्तनाच्या कर्करोगाचे सर्वांत मोठे लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ परंतु हे कर्करोगाचे एकमेव लक्षण नाही. याशिवाय, स्तनाच्या कर्करोगाची काही लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

1) स्तनाच्या कर्करोगाला एक कौटुंबिक इतिहास असतो. 2) आनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. 3) वयाच्या बाराव्या वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरु झाली असल्यास स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते.

4) वयाच्या ५५ व्या वर्षांनंतर रजोनिवृत्ती झाल्यासही या आजाराचा धोका वाढतो. 5) कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकाने हा आजार होतो. 6) लठ्ठ महिला, अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

1) स्तनामध्ये ताठरता किंवा गोळा येणे. 2) स्तनाना सूज किंवा बारीक खळगा पडणे. 3) न थांबणारी खाज येणे. 4) स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल. म्हणजे तो आक्रसला जाणे, लहान होणे वगैरे. 5) स्तनाग्रातून स्राव वाहणे, स्तनामध्ये वेदना होणे.

सकस आहार, नियमित व्यायाम करणे ही चांगली जीवनशैली आहे. मात्र, महिलांचे दुर्लक्ष असते. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. ब्रेस्टमधील गाठ ही कॅन्सरचीच आहे, असे नाही. त्याची पॅथॉलॉजिकल तपासणी झाल्याशिवाय कॅन्सर आहे असे म्हणता येत नाही. मात्र, गाठ काढून टाकता येते. ब्रेस्ट काढण्याची गरज नसते.