लग्नाआधी शारीरिक संबंध, काठीने 100 फटके मारण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:23 PM2021-07-02T17:23:31+5:302021-07-02T17:45:23+5:30

Crime News : ही घटना इंडोनेशियामध्ये अकेह प्रांतातील होक्स्योमावे शहरात घडली आहे.

इंडोनेशियातील एका महिलेला लग्नाआधी तिच्या प्रियकरासोबत संबंध ठेवणे खूप त्रासदायक ठरले. या जोडप्याला काठीने 100 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. यादरम्यान या महिलेची प्रकृती बिघडली. सर्व प्रयत्न करूनही ती शिक्षा सहन करू शकली नाही आणि वेदनामुळे बेशुद्ध पडली.

ही घटना इंडोनेशियामध्ये अकेह प्रांतातील होक्स्योमावे शहरात घडली आहे. या जोडप्याला लोकांसमोर शिक्षा देण्यात आली. काठीच्या फटक्यांच्या वेदनांमुळे या महिलेला खूप त्रास झाला आणि ती बेशुद्ध झाली.

ट्रिब्यून न्यूजच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीने या जोडप्याला रूम दिली होती, त्याला काठीच्या 75 फटक्यांची शिक्षा देण्यात आली होती. याव्यतिरिक्त, या प्रकरणात मद्यपान करणार्‍या दोन लोकांना काठीने 40-40 फटके देण्यात आले होते. या प्रकरणात इस्लामिक पोलीस प्रमुख जुल्किेफिल यांनी सांगितले की, या महिलेला शिक्षेनंतर उभे राहता येत नव्हते, त्यामुळे तिला तेथून घेऊन जावे लागले.

दरम्यान, इस्लामिक शरिया कायदा इंडोनेशियाच्या आचे क्षेत्रामध्ये लागू करण्यात आला आहे. या देशात एकच असे क्षेत्र आहे, जिथे शरिया कायदा मानला जातो. या क्षेत्रात 50 लाख लोक राहतात. यापैकी 98 टक्के मुस्लीम आहेत.

2001 साली इंडोनेशियन सरकारने या क्षेत्राला स्वायत्तता दिली होती, त्यानंतर येथे शरिया कायदा लागू करण्यात आला. या कायद्यात दारू पिणे, लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे आणि समलैंगिक संबंध ठेवणे, यासाठी काठीचे फटके मारण्याची शिक्षा तरतूद करण्यात आली आहे.

मानवाधिकार संस्था अनेकदा या अमानुष शिक्षेवर टीका करतात, परंतु इंडोनेशियातील आचे येथील लोकांचा या कायद्याचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आरोपींना देण्यात येणारी शिक्षा पाहण्यासाठी लोक येतात.

विशेष म्हणजे, कोरोना संकट काळात सुद्धा लोकांना सार्वजनिक ठिकाणी चाबूकाने मारहाण किंवा काठीने फटके मारण्याची शिक्षा देण्यात येत होती. यामुळे बर्‍याच लोकांनी जनतेसमोर शिक्षेच्या तरतुदीचा निषेधही केला होता. इंडोनेशियातील या भागात छोट्या छोट्या गुन्ह्यांची शिक्षा सहसा काठीने फटके मारण्याची केली जाते.

सन 2018 मध्ये या क्षेत्रातील प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी चाबूकाने किंवा काठीने मारहाण करण्याची संस्कृती संपविण्याविषयी चर्चा केली होती आणि म्हटले होते की गुन्हेगारांना जाहीरपणे शिक्षा होणार नाही तर तुरूंगात शिक्षा होईल. मात्र, असे असूनही लोकांसमोर शिक्षा दिल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.