Shraddha Walker Murder Case: 'आफताब बॅग घेऊन दिसला'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील महत्वाचं CCTV फुटेज लागलं हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:43 AM2022-11-19T11:43:46+5:302022-11-19T11:59:27+5:30

Shraddha Walker Murder Case: आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान पोलिसांना एक महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान पोलिसांना एक महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आहे. यामध्ये आरोपी आफताबच्या हातात एक बॅग दिसत आहे.

दिल्ली पोलिसांना १८ ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबच्या हातात बॅग दिसत आहे. आफताब १८ ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या विकृत मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे.

दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याला चौकशीसाठी माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कार्यालयात बोलावले होते. चौकशीनंतर लक्ष्मण नाडर याने प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही माहिती न देता तेथून तो निघून गेला.

श्रद्धाच्या हत्याकांडाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात आले होते. दरम्य़ान, आरोपी आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे.

दरम्यान, श्रद्धा हिच्या हत्येच्या दिवशी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबला गांजा ओढण्याचे व्यसन होते. श्रद्धा त्याला नेहमी ओरडायची. त्यावरून अनेकदा त्यांचे भांडण व्हायचे. श्रद्धाची हत्या झाली, त्या दिवशी आरोपी आफताब हा गांजाच्या नशेत होता, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.