Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्रींच्या कारपुढे आणखी एक कार होती...; डॉ. अनाहिता पंडोलेंच्या पतीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 01:22 PM2022-11-04T13:22:41+5:302022-11-04T13:28:45+5:30

Cyrus Mistry Car Accident mystery Solved: अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते.

अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. डेरियस हे आता बरे झाले असून त्यांनी अपघातावेळी नेमके काय घडले याची माहिती पोलिसांना दिली आहे. डेरियस यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

आमच्या पुढे आणखी एक कार होती. ती लेन बदलत होती. अनाहिता हिला तिसऱ्या लेनमधून आपली कार दुसऱ्या लेनमध्ये नेता आली नाही. यावेळी समोर पुलाचा कठडा आला आणि आमची कार त्यावर आदळली, असे डेरियस पंडोले यांनी सांगितले.

पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी डेरियस यांच्या घरी जाऊन जबाब नोंदविला. डॉ अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट आहेत. त्याच कार चालवत होत्या. अपघातानंतर दोघांनाही मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. डेरियस यांना गेल्याच आठवड्यात घरी सोडण्यात आले.

पंडोले यांना ४ सप्टेंबरला काय काय घडले हे ठीकसे आठवत नव्हते. त्यांना या घटनेची नीट आठवण करून दिल्यावर त्यांनी सारा घटनाक्रम सांगितला. पुढील कार तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये गेल्यावर पत्नीनेही आपली कार दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच तिला समोर ट्रक दिसला. यामुळे ती दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकली नाही. याचवेळी कार रेलिंगला आदळली, असे ते म्हणाले.

डॉ. अनाहिता पंडोले यांच्यावर अद्याप उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठीक झालेली नाही. यामुळे अनाहिता यांचा जबाब नोंदविता आलेला नाहीय. मर्सिडीज बेंझ देखील अपघाताचा तपास अहवाल देणार आहे. त्याची आम्ही वाट पाहत असल्याचे पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

डेरियस यांना 54 दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी एचएन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अनाहिताच्या नाक, बरगड्या आणि पेल्विक हाडांना फ्रॅक्चर आणि फुफ्फुसात जखमा झाल्या आहेत. डोक्याला मार लागल्याने सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. त्यांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. जहांगीरच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाली होती. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.