रात्री नखे कापणे शुभ का मानले जात नाही? धार्मिक मान्यता, व्यवहारिक कारण अन् शास्त्रीय आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:50 AM2022-03-05T11:50:42+5:302022-03-05T11:57:50+5:30

आपल्याकडे अनेक गोष्टी मान्यतांवर आधारलेल्या पाहायला मिळत असून, त्याचे अनुकरण चालिरितींनुसार होताना दिसते.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, घरातील वयोवृद्ध लोक रात्रीच्या वेळी नखे कापण्यास मनाई करतात. पण ते अशी मनाई का करतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. पण या प्रश्नाचे उत्तर क्वचितच कुणी देते.

प्राचीन काळापासून ते आताच्या आधुनिक काळातील विकसित नागरी संस्कृतीमधील प्रवासात दैनंदिन जीवनामध्ये मनुष्याने अमूलाग्र बदल केले आहेत. परंतु, बहुतांश वेळा एखादी गोष्ट करण्यामागे किंवा न करण्यामागे नेमके काय कारण असू शकते, याचा विचार केला जातोच असे नाही. बर्‍याच वेळा आपण त्या नियमांची खोली किंवा वास्तविकता जाणून घेतल्याशिवाय त्यांचे अनुसरण करीत असतो.

भारत देश आपल्या संस्कृती, परंपरा, चालिरिती आणि रुढी यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही परंपरा, संस्कृती यांचे अनुसरण जागतिक पातळीवरील अनेक देशांमध्ये केले जाते. आजच्या काळातही अनेक रीतिरिवाज, परंपरा, नियम असे आहे, जे हजारो वर्षांपासून चालत आले आहेत. सध्याच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीने प्रेझेंटेबल रहाणे खूप महत्त्वाचे मानले जाते. अन्यथा त्याची दखलच घेतली जात नाही.

शरीराची स्वच्छता, नीटनेटकेपणा यासह अगदी आपले केस, नखे यांची स्वच्छता, त्यांना व्यवस्थित कापलेले असणे या गोष्टींचाही अंतर्भाव केला जातो. आपल्याकडे अनेक गोष्टी धर्माशी निगडीत असलेल्या आढळतात. यामध्ये केस, नखे कापणे यांचाही समावेश असतो. अमुक एका दिवशी केस कापू नयेत. अमुक एका वेळी नखे कापू नयेत, असे परंपरागत पद्धतीने सांगितले जाते. पैकी रात्रीच्या वेळी नखे कापणे अशुभ मानले जाते. यामागे नेमके कारण काय?

आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे अनेक गोष्टी अशा असतात, ज्यांची शरीराला आवश्यकता नसते. नैसर्गिक प्रक्रियेनुसार त्या गोष्टी शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. मल, मूत्र, केस, नखे यांसारख्या माध्यमातून अनावश्यक गोष्टी शरीराबाहेर टाकल्या जातात. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही दैनंदिन जीवनात एका गृहस्थाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीपासून ते वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलेल्या संन्यासी व्यक्तीनेही कसे वर्तन करावे किंवा त्याचे राहणीमान कसे असावे, याबद्दल अनमोल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

प्राचीन काळापासून आपल्याकडे धर्माचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि राष्ट्रापर्यंत सर्व स्तरावर असल्याचे आपण पाहतो. आजही कोट्यवधी नागरिक धार्मिक असल्याचे दिसते. त्यामुळे व्यावहारिक आधार असला, तरी त्याला धर्माची जोड दिली आणि एखादी गोष्ट शुभ, अशुभच्या चौकटीत टाकली की, व्यक्ती, समाज त्या गोष्टी आपसुक करतो. त्यामुळे अनेक गोष्टी या विज्ञान, तर्क, व्यवहारिकता, आरोग्य यांवर आधारित असल्या, तरी धर्माची जोड असल्यामुळे त्याचे पालन काटेकोरपणे आणि नियमितपणे केले जाते, असा एक मतप्रवाह असल्याचे सांगितले जाते.

दुसरे म्हणजे नखांना अहंकाराची उपमा दिली जाते. अहंकारामुळे एखादी गोष्ट कुठल्या कुठे जाते, याची अनेक उदाहरणे आपण दररोज पाहत असतो. त्यामुळे प्राचीन ग्रंथांमधील शिकवणीपासून व्यवहारिकेपर्यंत अहंकार दूर करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अहंकाररुपी नखे नियमितपणे कापावीत, त्याची वाढ होऊ देऊ नये, असे सांगितले जाते. आरोग्याच्या दृष्टिने विचार करावयाचा झाल्यास नखे किंवा केस न कापल्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो, असे सांगितले जाते.

आपल्या प्राचीन धर्मात अनेक गोष्टींचे विस्तृत विवेचन केलेले आढळते. अनेक गोष्टी का कराव्यात आणि का करू नयेत, याबाबतही तर्क, व्यवहारिकता, शास्त्र (विज्ञान), आरोग्य यांच्या आधारावर विश्लेषण केल्याचे आढळते. एखाद्या व्यक्तीला अमूक एक गोष्ट कर किंवा करू नको, असे सांगितल्यास ती व्यक्ती ऐकतेच, असे नाही. त्या व्यक्तीला गोष्ट पटण्यासाठी काहीतही आधार द्यावा लागतो. यासाठी अनेकदा धर्माची जोड दिली जाते, असे सांगितले जाते.

आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. नखांच्या रंगानुसार विविध आजार ओळखता येतात, असे सांगितले जाते. कापलेली नखे घरात पडू नयेत, याची काळजी अवश्य घ्यावी. याचे कारण खाली पडलेल्या नखातून घाण, माती, जीव-जंतू पुन्हा आपल्या शरीरात जाऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले जाते.

आजच्या नव्या पिढीचे विचार काळाप्रमाणे आधुनिक आहेत. काही विचारांच्या मागे निश्चित तर्क असतात, हा विचार आधुनिक पिढी करताना दिसत नाही. त्यांना जुन्या विचारांवर सहजासहजी विश्वास बसत नाही आणि हे असले जुनाट विचारांना ते अमान्य करतात. नखे आपल्या बोटांवर एक मजबूत थर असते, ज्याने आपल्या बोटांचे रक्षण होते. म्हणून नखे कापताना सावधगिरी बाळगली पाहिजे. जेणेकरून आपल्या बोटांना कसलीही इजा होऊ नये.

पूर्वीच्या काळात वीज नसायची. सर्वत्र अंधारच असायचा. अशा वेळेस प्रत्येक जण दिवसाढवळ्या आपली सर्व कामे सूर्यप्रकाशातच उरकून घेत असे. सूर्याच्या प्रकाशातच नखेही कापली जायची. त्यामुळे बोटांना कोणत्याही प्रकाराचे नुकसान होण्याची शक्यता नसायची.

नखे वाढत जातात, तेव्हा त्यामध्ये घाण जमा होऊ लागते. जी खाताना, जेवताना आपल्या पोटात जाते. यामुळे बर्‍याच रोगांना आमंत्रण मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच नखे नियमितपणे कापावीत, असे सांगितले जाते.

दिवसाच्या प्रकाशात नखे कापण्यामागे दुसरा तर्क म्हणजे फार पूर्वीच्या काळात वीजेसह आजच्यासारखे नेलकटरही नव्हते. त्यामुळे धारदार वस्तूंचा वापर करून नखे कापली जायची. अंधारात धारदार वस्तूंचा वापर केल्यामुळे बोटाला, शरीराच्या अन्य अवयवाला इजा होण्याची शक्यता अधिक असायची. त्यामुळे रात्री नखे न कापण्याचा सल्ला दिला जातो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे या गोष्टीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी त्याला धर्माची जोड देण्यात आलेली आहे. आधुनिक काळात वीज आहे, नेलकटर आहे. त्यामुळे आपल्याला वेळ मिळेल, तेव्हा आपण केव्हाही नखे कापू शकतो. मात्र, नखे कापताना काळजी घेणे आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे.

अनेकदा लोक आपल्या सोयीनुसार जिथे जागा मिळेल तिथे बसून किंवा उभे राहून नखे कापणे सुरू करतात. ही फारच चुकीची सवय आहे. नखे कापताना एका व्यवस्थित जागी बसा आणि हळुवार नखे कापावी. कापलेली नखे एका कागदात जमा करा नंतर ते डस्टबिनमध्ये टाकावी.