मंगळाचा धनु प्रवेश: ८ राशींना नववर्ष मंगलमय, बचत वाढेल; धनलाभ योग, उत्तम संधींचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:13 PM2023-12-27T12:13:30+5:302023-12-27T12:21:44+5:30

नववर्षाची सुरुवात होताना मंगळाचा धनु राशीत झालेला प्रवेश मेष ते मीन सर्व राशींवर कसा प्रभावकारक ठरेल? जाणून घ्या...

२७ डिसेंबर रोजी नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळ ग्रहाने गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत धनु राशीत सूर्य आणि बुध हे दोन ग्रह विराजमान आहेत. मंगळ आणि सूर्याच्या संयोगाने आदित्य मंगल राजयोग जुळून येऊ शकेल. तसेच बुधाच्या संयोगाने त्रिग्रही योग जुळून येणार आहे.

मंगळ ग्रह सुमारे ४५ दिवस एका राशीत असल्याचे सांगितले जाते. १६ जानेवारी रोजी मंगळ ग्रह उदय होणार आहे. मंगळाचा धनु राशीतील प्रवेश महत्त्वाचा मानला गेला असून, देश-दुनियेसह सर्व राशींवर याचा प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे.

मंगळाचा धनु राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक ठरू शकेल. तर, काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. नववर्षाची सुरुवात कोणत्या राशींसाठी मंगलमय ठरू शकेल? मेष ते मीन या राशींवर मंगळाचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...

मेष: उत्साही वाटेल. ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. भावंडे पूर्ण सहकार्य करतील. जे काही काम करायचे आहे किंवा जे काही हवे आहे, त्यासाठी कठोर परिश्रम कराल. यश मिळवाल. कामाबद्दल आणि निर्णयांबाबत तुमचा आत्मविश्वास वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

वृषभ: काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. वाहन चालवताना किंवा स्वयंपाक करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. नवीन वर्ष आर्थिक बाबतीत खूप चांगले जाणार आहे.चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो.

मिथुन: कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. गुंतवणूक करण्यासाठी व्यवसाय किंवा भागीदार शोधत असाल तर नवीन वर्ष फायदेशीर असेल. चांगले पर्याय मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन वर्षात चांगले कौटुंबिक वातावरण असेल. सर्व सदस्य एकमेकांना मदत करतील.

कर्क: अनेक बड्या लोकांची ओळख होईल. भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. शिक्षणात शुभ परिणाम मिळतील. कोणताही शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

सिंह: करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात चांगली वाढ होईल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्ष चांगले जाणार आहे. आई-वडिलांकडून आशीर्वाद मिळतील. भावंडांसोबत संबंध अनुकूल राहतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मुलांच्या भविष्यासाठी काही मालमत्ता खरेदी करू शकता. मुलांची अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

कन्या: सुखसोयींमध्ये वाढ होईल. अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्ष चांगले जाणार आहे. पालकांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन वर्षात मोठा नफा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. परंतु खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. भावंडांसोबतच्या नातेसंबंधात चढ-उतार येऊ शकतात.

तूळ: भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्साही असाल. आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. धैर्य वाढेल. नवीन वर्षात आतापर्यंत अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. यशही मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना उत्तम संधी मिळू शकेल. लव्ह लाइफमध्ये असलेल्यांसाठी नवीन वर्ष चांगले असेल.

वृश्चिक: नवीन वर्षात भावंडांशी संबंध चांगले राहतील. गरजेच्या वेळी साथही मिळेल. विरोधक पूर्ण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, पण विरोधकांना पराभूत करण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल. नवीन वर्षात केलेल्या प्रयत्नांचा नक्कीच फायदा होईल. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळतील. धार्मिक कार्यात रस असेल.

धनु: आश्चर्यकारक आत्मविश्वास दिसेल. प्रत्येक कार्य करण्याचे धैर्य करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण करेल. व्यक्तिमत्वावरही प्रभाव पडणार आहे. वागण्यात बदल दिसून येतील. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. कोणताही निष्काळजीपणा टाळावा.

मकर: खर्चांवर नियंत्रण ठेवा. तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा, अन्यथा गुंतवणूक करू नका. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही योजना काही काळासाठी पुढे ढकला. भावासोबत किंवा नातेवाईकाशी मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. सावधगिरी बाळगा.

कुंभ: नेतृत्व करण्याची संधी मिळेल. भौतिक गोष्टींकडे कल चांगला असेल. लक्ष पूर्णपणे ध्येयांवर केंद्रित राहील. त्या दिशेने काम करत राहाल. मित्रांसोबत चुकीच्या गोष्टी करणे आणि त्यांच्या प्रभावात राहणे टाळा. अन्यथा जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. नवीन वर्षात पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. बँक बॅलन्सही वाढेल.

मीन: करिअरच्या प्रगतीसाठी जे काही काम करायचे आहे ते पूर्ण कराल. यशस्वी व्हाल. नवीन वर्ष उत्तम संधी घेऊन येईल. सर्व निर्णय धैर्याने घ्याल. ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरी बदलायची आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल. कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. नातेसंबंध मजबूत राहतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.